शेळगाव: (प्रतिनिधी: रसूल पठाण) भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्या.शेळगाव या संस्थेच्या संचालक मंडळाचे सन. २०२२ ते २०२७ या कालावधी करता नुकतीच बिनविरोध निवडणूक पार पडली. राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या या सोसायटीत दिनांक १७ मे २०२२ रोजी संस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाची निवड बिनविरोध झाली. सर्व संचालक मंडळ व उपस्थित निवडणूक निर्णय अधिकारी श्री.जे.पी.गावडेसो यांच्या अध्यक्षतेखाली सदरची प्रक्रिया संपन्न झाली.त्यामध्ये साहेबराव पांडुरंग शिंगाडे यांची चेअरमनपदी तर उमेश झुंबर ननवरे यांची व्हाईस चेअरमनपदी निवड झाली. श्री साहेबराव पांडुरंग शिंगाडे हे संस्था स्थापनेपासून म्हणजेच १९८८ पासून आजतागायत सलग ३४ वर्षे संस्थेचे चेअरमनपद भूषवित आहेत संस्थेच्या संचालकांनी पुन्हा एकदा त्यांच्याच गळ्यात चेअरमनपदाची माळ घातली आहे. सदर संस्थेचे २१०० सभासद असून भाग भांडवल १ कोटी ७५ लाख रुपये असून संस्थेची वार्षिक उलाढाल ३० कोटी रुपये आहे.संस्थेची स्वमालकीची ६५०० चौरस फुटाची इमारत आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार व राज्यमंत्री श्री दत्तामामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली येथून पुढे संस्थेचा पारदर्शक कारभार करण्याची ग्वाही चेअरमन श्री साहेबराव शिंगाडे व व्हाईस चेअरमन उमेश ननवरे यांनी दिली.