बारामती (शिवनगर) : अतिशय धक्कादायक माहिती हाती आली असून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार माळेगाव सहकारी साखर कारखान्यात ऊस नेत नसल्याच्या वादातून समीर शहाजी धुमाळ (रा. धुमाळवाडी, ता. बारामती) या युवकाने येथील कार्यकारी संचालकांच्या कक्षात अंगावर राॅकेल ओतून घेतले.हा प्रकार सोमवारी दुपारी घडला. दरम्यान लागलीच धुमाळ यांना आवरण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. परंतु अचानक झालेल्या या घटनेने प्रशासनाची मोठी धांदल उडाली.
भावा-भावांचा जमिनीचा असल्याची माहिती प्रथमदर्शनी समोर येत आहे. त्यातून ऊसतोडणी रखडल्याने समीर यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. जमिनीच्या वादामुळे कारखाना ऊस तोडून आणण्यास नकार देत आहे. तुम्हीच तुमचा ऊस तोडून कारखान्याला घेवून या, असे कारखान्याकडून सांगितले जात होते.
तर, दुसरीकडे समीर हे कारखान्याने ऊस तोडून आणावा यासाठी आग्रही होते. यातून त्यांचे कारखाना प्रशासनाशी खटके उडत होते. याच कारणावरून सोमवारी त्यांनी थेट राॅकेल सोबत घेवून येत कार्यकारी संचालकांच्या कक्षात अंगावर ओतून घेतले. जमिनीच्या कौटुंबिक वादातून धुमाळ यांनी हा प्रकार केलेला आहे अशी माहिती प्रशासनाकडून सांगण्यात आली आहे