करमाळा (प्रतिनिधी-आम्रपाली शिंदे):करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या श्रीक्षेत्र संगोबा येथील आदिनाथ महाराजांची यात्रा भरणार असल्याचे तहसीलदार समीर माने यांनी जाहीर केले. या संदर्भात पार पडलेल्या बैठकीमध्ये कोरोना नियमांचे पालन करून यात्रा भरवण्याचे ठरविण्यात आले. करमाळा, जामखेड ,परांडा परिसरातील सर्वात मोठी यात्रा म्हणून याकडे पाहिले जाते. सलग दोन वर्षे यात्रा बंद असल्यामुळे या वर्षीदेखील यात्रा भरते की नाही अशा मनस्थितीत नागरिक होते. या वर्षी यात्रा भरणार असे समजताच आजूबाजूच्या तीस-चाळीस गावातील आबालवृद्धांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले असून सर्वजण येणाऱ्या महाशिवरात्री ची वाट पाहत आहेत .यंदा यात्रेसाठी साधारण पन्नास हजार भाविक देव दर्शनासाठी येतील असा अंदाज आहे .संगोबा यात्रे मध्ये भरणारा काठ्यांचा बाजार फार वर्षापासून प्रसिद्ध आहे. संगोबा यात्रेमध्ये किमान चारशे ते पाचशे लहान-मोठे व्यावसायिक आपल्या दुकानाचा स्टॉल लावून बसतात. यामधून दोन दिवसात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. यात्रा कालावधीमध्ये करमाळा परिवहन आगरालादेखील चांगला नफा मिळत असतो. मात्र यावर्षी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे येणाऱ्या भाविकांची तारांबळ होणार हे निश्चित आहे. सदर यात्रेसाठी ग्रामपंचायत पोथरे, निलज यांचेतर्फे यात्रेसाठी येणाऱ्या व्यावसायिकांना आपली दुकाने लावण्यासाठी साफसफाई केली आहे. मंदिर परिसरातील काटेरी झाडे-झुडपे काढलेली आहेत .तसेच यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे संगोबा येथील बंधारा तुडुंब भरला असून, येणाऱ्या भाविकांना निसर्गाचा मनमुराद आनंद मिळणार आहे.