शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय- हर्षवर्धन पाटील

इंदापूर: प्रतिनिधी : शेटफळ-हवेली (ता. इंदापूर) येथील बावडा परिसरातील 10 गावांमधील शेतीला जलसिंचनाची सुविधा पुरविणाऱ्या तलावामध्ये नीरा डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे वीर धरणातून सोडण्यात येणारे पाणी येत्या तीन दिवसात तलावामध्ये पोहचेल, अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (दि.12) दिली दिली.सध्या भाटघर व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पावसाने या दोंन्ही धरणातील पाणीसाठा वाढत आहे. तसेच लाभक्षेत्रातही पाऊस होत असल्याने पिकांसाठी पाण्याची फारशी मागणी नसल्याने वीर धरणातून नीरा डाव्या कालव्यामध्ये तातडीने पाणी सोडून शेटफळ तलाव पाण्याने भरून घेणे संदर्भात पुणे पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता संजीव चोपडे व कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांचेशी चर्चा झाली, त्यानुसार पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
राज्यात युतीचे सरकार सत्तेवर आले आहे, त्यामुळे आता शेतीला पाणी कमी पडणार नाही, असेही हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले, शेटफळ तलाव पूर्ण क्षमतेने पाण्याने भरून घेण्यात येणार असल्याने लाभक्षेत्रातील शेटफळ हवेली, भोडणी, सुरवड, वकीलवस्ती, बावडा, पिठेवाडी, निरनिमगाव, कचरवाडी(बा.), सराटी, लाखेवाडी या 10 गावांमधील शेतीला वर्षभर पाणी उपलब्ध होणार आहे. शेटफळ तलावावरती अनेक गावच्या पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत, त्यांनाही वर्षभर पाणी उपलब्ध होणार आहे, असेही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here