– वीरपत्नी सौ. हेमलता बाबुराव साबळे यांना जिजाऊ पुरस्काराने सन्मानित
– वीरपत्नी आणि वीरमाता यांना साडी चोळी देऊन केले जिजाऊ पूजन तसेच आजी-माजी सैनिकांना रोपटे देऊन केला सन्मान
इंदापूर: शिवभक्त परिवार इंदापूर आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे दि. 12 जानेवारी 2024 रोजी कला , विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले होते. सर सेनापती प्रतापराव गुजर यांचे तेरावे वंशज सयाजी नामदेव गुजर हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.माजी मंत्री व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे औचित्य साधत वीर पत्नी प्रतिभा जैन यांना इंदापूर महाविद्यालयात शिक्षक नियुक्तीपत्र देऊन सन्मानित केले.यावेळी अमर शहीद जवान बाबुराव रामचंद्र साबळे ( अंथुर्णे) यांच्या वीर पत्नी हेमलता बाबुराव साबळे यांना जिजाऊ पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ राजमाता हे नाव उच्चारले की आपल्या डोळ्यासमोर जे चित्र दिसते ते म्हणजे हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे जगातील सर्वात मोठे राजे छत्रपती शिवाजी महाराज होय. याचे जनक जर कोण असतील तर ते म्हणजे राजमाता जिजाऊ होय. राजमातेचा विचार त्यांची संकल्पना नव्या पिढीसमोर उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. राजमाता जिजाऊंच्या जीवनात अनेक संकटे आली मात्र त्यांनी कधीही न डगमगता हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठीचा ध्येय संकल्प छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर ठेवला. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते.स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन आपण युवा दिन म्हणून साजरा करतो. स्वामी विवेकानंद स्वतः युवा होते. त्यांचा विचार ,धारणा , संकल्प युवा होता . स्वामी विवेकानंदाच्या आत्मचरित्रातून आपल्याला त्यांच्या विचाराची ,वक्तृत्वाची ,शब्दाची ताकद लक्षात येते. उठा ,जागे व्हा आणि आपले लक्ष साध्य करा हा विचार त्यांचा प्रेरणादायी आहे .पुढे हर्षवर्धन पाटील म्हणाले की इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाने आज सर्वात महत्त्वाचा उपक्रम राबविला व माझ्या जीवनातला सर्वात मोठा आनंदाचा क्षण हा आहे की आज एका वीर पत्नीला शिक्षक नियुक्तीपत्र देऊन त्यांना जिजाऊ जन्मोत्सवादिनी सन्मानित करता आले. विधवा स्त्रियांच्या स्त्री अलंकाराच्या संदर्भात समाजभूषण डॉ. लक्ष्मण आसबे यांनी जी सामाजिक चळवळ उभारली आहे ती उल्लेखनीय आहे.’
समाजभूषण डॉ. लक्ष्मण आसबे यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वाने व्याख्यानात राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांचा वैभवशाली इतिहास अनेक प्रसंग, शौर्य पराक्रम विद्यार्थी नागरिकांपुढे जसेच्या तसे उभा करून मार्गदर्शन केले ते पुढे म्हणाले की एक मराठा लाख मराठा ही घोषणा प्रतापराव गुजर यांच्या कर्तृत्वातून आली असून जात धर्माच्या पुढे ती कर्तुत्वान मावळ्यांच्या कार्याची ओळख आहे.युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानाला आपण अमर जवान म्हणतो तसे त्यांच्या वीर पत्नीला कायमस्वरूपी आपण सौभाग्यवतीचा सन्मान दिला पाहिजे.यावेळी सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे तेरावे वंशज सयाजी नामदेव गुजर यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
यावेळी भाजपा युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख निरा भिमा व कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, ॲड. मनोहर चौधरी , ॲड.अशोक कोठारी ,माजी नगरसेवक शेखर पाटील, सामाजिक कार्यकर्ते बापू जामदार, उपप्राचार्य प्रा.दत्तात्रय गोळे आणि शिवभक्त परिवाराचे सर्व मान्यवर सदस्य यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. शिवभक्त परिवाराचे सदस्य प्रकाश खांबसवाडकर यांनी आभार मानले.