वीरश्री मालोजीराजे गढी संवर्धन व स्मारकासाठी लागेल तेवढा निधी देण्यास शिवसेना-भाजप सरकार कटिबद्ध- हर्षवर्धन पाटील.

👉 इंदापूर येथील मालोजीराजे गढी संवर्धनाचा बृहत आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व हर्षवर्धन पाटील चर्चा
👉 शिवसेना-भाजप सरकार निधी देण्यास कटिबद्ध
इंदापूर : इंदापूर येथील वीरश्री मालोजीराजे यांच्या ऐतिहासिक गढीचे संवर्धन व स्मारक उभारणेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे प्रधान सचिव (पर्यटन) यांना बृहत आराखडा सादर करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईत यासंदर्भात शनिवारी (दि.25) चर्चा केली. सदर प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गढी संवर्धन व स्मारकासाठी लागेल तेवढा निधी देण्यास शिवसेना-भाजप सरकार कटिबद्ध असल्याचा निर्वाळा हर्षवर्धन पाटील यांना दिला.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे यांचे वास्तव्य असलेल्या इंदापूर येथील ऐतिहासिक गढी संदर्भात माहिती दिली. निजामशाहीच्या काळात अनेक गावे वतन दिलेली होती, या वतन गावांमध्ये इंदापूर हे गाव मालोजीराजे यांना वतन दिलेले होते. इंदापूर येथे सन १६०६ मध्ये झालेल्या युद्धात मालोजीराजे यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांची समाधी त्यांचे वास्तव्य असलेल्या पुरातन गढी समोरील जागेत होती, याची नोंद शिवभारत ग्रंथात आढळून येते.
सदरच्या गढीमध्ये तहसील कार्यालय, न्यायालय यांचे कामकाज चालत होते. मात्र आता सदरची कार्यालये अन्यत्र नूतन इमारतीमध्ये स्थलांतरित झालेली आहेत. त्यामुळे आता या ऐतिहासिक मालोजीराजांच्या गढीच्या संवर्धना संदर्भात शासकीय कागदपत्रानुसार हस्तांतरण करून, गढीला पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन, सदर ठिकाणी वीरश्री मालोजीराजेंचे भव्य स्मारक उभारणेच्या कामाचा बृहत आराखडा तयार करून, निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हर्षवर्धन पाटील यांनी निवेदनाद्वारे केली. त्यावर बृहत आराखडा सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here