लोकसभेत सुप्रियाताई सुळे यांचाच डंका, सलग सातव्यांदा “संसदरत्न पुरस्कार” घोषित.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार घोषित झाला आहे.याबाबत स्वतः सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत माहिती दिली. तसेच पहिली प्रतिक्रिया देत हा सन्मान आपल्या बारामती मतदारसंघातील प्रत्येकाचा असल्याची भावना व्यक्त केली. संसदरत्न पुरस्कार चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन व प्रीसेन्सच्या वतीने संसदेतील खासदारांच्या कामांचं मुल्यमापनावर दिला जातो.सुप्रिया सुळे म्हणाल्या, “चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन व प्रीसेन्सच्या वतीने देण्यात येणारा संसदरत्न पुरस्कार सलग सातव्यांदा घोषित झाला. आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असताना केलेल्या संसदीय कार्याची दखल घेतली गेली याचे समाधान आहे. हा सन्मान आपल्या मतदारसंघातील प्रत्येकाचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवत मला संसदेत बारामती लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली.”
👉 “हे प्रेम मला आपल्यासाठी काम करण्याची ऊर्जा देते”
“सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण सर्वजण तसेच संसदेतील सहकारी, संसदेतील स्टाफ, माझे सर्व सहकारी यांची सातत्याने बहुमोल अशी साथ कायम मिळत आहे. याबद्दल मी सर्वांची शतशः ॠणी आहे. आपला हा विश्वास, हे प्रेम मला आपल्यासाठी काम करण्याची ऊर्जा देते. हा स्नेहबंध आणखी दृढ व्हावा ही प्रार्थना,” अशी भावना सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्वीटमध्ये व्यक्त केली.
👉 “शरद पवार यांचा उदय झाला तो हा दिवस”
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी (२२ फेब्रुवारी) या दिवसाचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं विशेष नातं असल्याचं सांगितलं. त्या म्हणाल्या, “महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर आदरणीय शरद पवार यांचा उदय झाला तो हा दिवस. बरोबर ५५ वर्षांपूर्वी ते विधानसभेत निवडून गेले होते. संसदीय कामकाजात सक्रियतेची या ५५ वर्षात त्यांनी राज्य मंत्रिमंडळात मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अशी विविध पदे भुषविली.”
“यासह लोककल्याणकारी निर्णय घेऊन ते आग्रहाने राबविले देखील. त्यांनी या कार्यकाळात संसदीय प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक महत्वपूर्ण भूमिका बजावल्या. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी दाखविलेल्या मार्गावर ते आजही अविरतपणे चालत आहेत. त्यांची ही वाटचाल आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे. आदरणीय शरद पवार यांना संसदीय कारकीर्दीची ५५ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा,” असंही सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here