💉 मुलांचे लसीकरण ऑक्टोबरपासून होणार सुरु, व्याधीग्रस्त मुलांना प्राधान्य..!
देशातील ८० कोटी लोकांना आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून १२ ते १७ वयोगटातील मुलांना लसीचा पहिला डोस देण्यास सुरुवात होणार असल्याचे सूत्रांकडून समजले.देशातील १२ वर्षांखालील मुलांमध्ये कोरोना संसर्ग झाला नसल्याचे सिरो सर्व्हेतून आढळले आहे. प्रौंढाचे लसीकरण झाल्याने १२ ते १७ या वयांच्या मुलांना आधी लस देण्याचा मानस आहे. देशात १८ वर्षांखालील मुलांची संख्या सुमारे ४४ कोटी असून, त्यातील १२ ते १७ वयोगटातील मुलांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे. लहान मुलांमध्ये मोठे आजार व त्यातून मृत्यू होण्याचे प्रमाण कमीच असते. त्यामुळे त्यांच्याऐवजी पालकांच्या सुरक्षिततेवर आधी लक्ष दिले, त्यांना आधी लस देण्यात आली. आता सुरुवातीला व्याधीग्रस्त मुलांना लस देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
⁉️ कोणती लस देणार..?
औषध महानियंत्रकांनी झायडस कॅडिलाच्या झायकोव-डी लसीच्या आपत्कालीन वापराला २० ऑगस्ट रोजी परवानगी दिली आहे. भारतात १२ वर्षांवरील मुलांना दिली जाणारी ही पहिली लस असेल.देशात १२ ते १७ या वयोगटातील सुमारे १२ कोटी मुले असून, त्यातील जेमतेम १ टक्का मुले व्याधीग्रस्त आहेत. ही संख्या सुमारे ४० लाख असण्याचा अंदाज आहे. त्यांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मोफत लस देण्यास सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले.