लळा लावत संभाळलेल्या हरणाच्या पाडसाने शिवला यशोदीपच्या तिसऱ्याच घास..

लळा लावत संभाळलेल्या हरणाच्या पाडसाने शिवला यशोदीपच्या तिसऱ्याच घास

सोलापूर : अपघातात मृत्यू झालेल्या ‘कामू’चे दु:ख संपूर्ण कौठाळीकरांना होतेच. लळा लावलेले हरिणाचे पाडस प्रेताभोवताली घुटमळले, शिवाय त्याने घास शिवून कामूवरील निस्सीम प्रेम दाखविले.
त्याचे असे झाले. उत्तर तालुक्यातील कौठाळी येथील कामू उर्फ यशोदीप देवीदास माने (वय २०) याचा ट्रॅक्टर अपघातात शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. यशोदीप ट्रॅक्टरमध्ये कौठाळी येथून कडबा घेऊन बार्शीला गेला. दोन ट्रॅक्टर ट्राॅलीमधील कडबा बार्शीत उतरवून परत गावाकडे निघाला. पानगावजवळ ट्रॅक्टर उलटून यशोदीप उर्फ कामूचा जागेवरच मृत्यू झाला.
कामूच्या अपघाती निधनाचा चटका संपूर्ण कौठाळीच्या नागरिकांना लागला होता. शनिवारी दुपारी शववाहिकेतून यशोदीपचा मृतदेह शेतातील घरी आणण्यात आला. ॲम्ब्युलन्सकडे कामूने लळा लावलेले हरीण धावले. मृतदेहाभोवती घुटमळत घुटमळत तिथे थांबून राहिले. नंतर भडाग्नी देईपर्यंत थांबले. तिसऱ्या दिवशी अस्थिविसर्जनासाठी लोक जमले. त्यावेळी पाडसही हजर होते. कुटुंबातील लोक नैवेद्य ठेवून पाया पडून कावळ्याची वाट पाहू लागले. कावळा आला खरा, मात्र घास हरिणानेच शिवला. कामूच्या निधनाची चर्चा तर लोकांनी केलीच, शिवाय लहानपणापासून दूध पाजून सांभाळलेल्या मालकाला शेवटचा निरोप द्यायलाही हरीण आले हे लोकांना भावले.
👉 प्रेमाने सांभाळले होते..
यशोदीप माने हा कुटुंबासह शेतात राहत होता. त्याला शेतात हरिणाचे पाडस हाती लागले. त्याने आणले व गाईचे दूध बाटलीने पाजून त्याचा प्रेमाने सांभाळ केला. कामू अन् हरिणाची मैत्री घट्ट झाली होती.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here