राज्यमंत्री दत्तामामांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुचेनात का? पुन्हा “मुख्यमंत्री देवेंद्र ” म्हणून उल्लेख.

इंदापुर: सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व तब्बल आठ खात्यांचे राज्यमंत्री असलेले दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील शहा गावी भर सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांचे नाव विसरले, आणि पुन्हा खळबळ उडवून दिली. राज्यमंत्री भरणे यांनी बोलताना चुकून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऐवजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अर्धवट नाव घेतले. मात्र प्रसंगावधान राखत आपल्या चूकीची दुरुस्ती करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुन्हा नाव घेत त्यांच्यावर मुक्तकंठाने स्तुतीसुमने उधळत माणूस टेंन्शनमध्ये असतो असे म्हणत चुकीवर पांघरूण घातले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि राज्यमंत्र्यांना रुजेनात की काय असाच काहीसा प्रकार दिसून येत आहे.
तर महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकार दहा मार्च पर्यंत कोसळणार अशी भविष्यवाणी काही दिवसांपूर्वी केली होती. त्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री भरणे यांच्या वरील वक्तव्यास विषेश महत्त्व प्राप्त झाले आहे.
राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील शहा गावात १२ कोटी १५ लाख निधीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ भरणे यांच्या हस्ते करण्यात आला होता. यावेळी सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ‘मुख्यमंत्री देवेंद्र‘ एवढे म्हणताच त्यांना त्यांची चूक समजली, व तात्काळ त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा उल्लेख केला,त्यामुळे चुकता चुकता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नामोल्लेख दुरुस्त केल्याचं यावेळी उपस्थितांना दिसून आले.
मात्र भरणे एवढी मोठी चूक सातत्याने का करत आहेत? याचाच प्रश्न इंदापूर सह संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे.
राज्यमंत्री भरणे या अगोदर 14 फेब्रुवारी रोजी इंदापूर येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्यक्रमात भरणेंना चक्क मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर पडलेला दिसून आला होता, त्यावेळी भरणे यांनी त्यांच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा उल्लेख केल्याने एकच खळबळ उडाली होती, नंतर व्यासपीठावरील मान्यवरांनी त्यांची चूक लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा उल्लेख करत चूक दुरुस्त केली होती.मात्र दि.६ मार्च रोजी इंदापूर तालुक्यातील शहा या गावी अशीच राज्यमंत्री भरणे यांच्याकडून मागे झालेल्या चुकीची पुनरावृत्ती झाली.
त्यामुळे अजूनही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मनातील “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस” च आहेत की असा प्रश्न निर्माण होतो.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here