मुंबई : विलीनीकरणाच्या मुद्यावरून संपावर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा निर्वाणीचा इशारा दिला आहे.जे कर्मचारी सोमवारपर्यंत कामावर हजर होतील, त्यांचे निलंबन मागे घेतले जाणार असल्याची घोषणा परब यांनी केली आहे. जे हजर होणार नाहीत, त्यांच्यावर मंगळवारपासून कारवाई सुरू केली जाईल, असंही परब यांनी स्पष्ट केलं आहे.
परब यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ देण्यासाठी महामंडळाने पाऊल उचललं आहे. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत किंबहूना काही राज्यांपेक्षा जास्त पगारवाढ मिळाली आहे.कर्मचारी एकाच गोष्टीवर ठाम असल्याने इतर बाबींचा चर्चाच होऊ शकली नाही. पगारवाढ करूनही कर्मचारी कामावर येत नसल्याने सुमारे 10 हजार जणांचे निलंबन करण्यात आले आहे. रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त झाली आहे. आता कर्मचाऱ्यांच्या लक्षात यायला लागले आहे की, विलीनीकरणाचा प्रश्न न्यायालयातच सुटेल. त्यामुळे अनेक कर्मचारी चिंतेत आहे. गटागटाने आमच्याशी संपर्क साधत आहेत, चर्चा करत आहेत, असे परब यांनी सांगितले.
निलंबन झाले म्हणून काही कर्मचारी आत्महत्येचा प्रयत्न करतात. त्याचे लगेच राजकारण होते. आत्महत्येचे कारण काही असले तरी त्याला या संपाशी जोडले जात आहे. आत्महत्या हा त्यावरचा पर्याय नाही. त्यामुळे आम्ही सतत आवाहन करत आहोत. राज्यभरातील विभागीय नियंत्रकांशी मी बोललो आहे. निलंबन असल्याने, काही जण अडवणूक करत असल्याने कामावर येता येत नाही, असं काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे असल्याचे परब यांनी नमूद केले.याचा विचार करून आम्ही आज महत्वाचा निर्णय घेतला आहे. जे कामगार सोमवारपर्यंत कामावर येतील, त्यांचे निलंबन मागे घेतले जाईल. ते त्याच डेपोमध्ये काम करतील. तिथे काम नसल्यास इतर आगारांमध्ये त्यांना पाठविले जाईल. तसे लेखी आदेश सर्व आगारांपर्यंत जातील, असं परब यांनी स्पष्ट केलं संधी दिली नाही, असं होऊ नये, म्हणून ही संधी दिली जात आहे. जे कामगार अद्याप निलंबित झाले नाहीत, त्यांनीही कामावर यावे, असं आवाहन परब यांनी केले आहे.
कामावर येण्यास काही जणांनी अडवल्यास संबंधित कामगारांनी पोलीस लगेच तक्रार करावी. जे कामगार अडवतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. सोमवारनंतर जे हजर होणार नाहीत, त्यांच्यावर प्रशासकीय प्रक्रियेनुसार पुढील कारवाई केली जाईल, असा इशाराही परब यांनी दिला आहे. कायद्याच्या दृष्टीने अजून एक संधी देण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे कामगारांनी ही संधी सोडू नये, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असे परब यांनी स्पष्ट केले. एकंदरीतच या सर्व घडामोडी पाहता येणारा सोमवार हा लालपरी कामगारांसाठी व लालपरीसाठी ऐतिहासिक दिवस ठरणार आहे कारण सोमवारी कामगार कामावर हजर झाले नाहीत तर शासन त्यांच्यावर कठोर कारवाई करू शकते. व आंदोलन आणखी चिघळेल का अशीही शंका वाटते त्यामुळे कामगार स्वईच्छेने कामावर यावेत व सामान्य लोकांची होणारी अडचण दूर व्हावी असेच आता महाराष्ट्रातील जनतेमध्ये बोलले जात आहे.