मालोजीराजे गढी संवर्धनाचा बृहत आराखडा सादर करण्याचे पर्यटन विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व हर्षवर्धन पाटील भेटीनंतर पर्यटन विभाग ॲक्शन मोडवर
– मालोजीराजे गढी संवर्धन व स्मारक उभारणेसाठी शिवसेना-भाजप सरकारकडून हालचाली
इंदापूर : प्रतिनिधी दि.3/4/23
इंदापूर येथे वीरश्री मालोजीराजे यांच्या ऐतिहासिक गढीचे संवर्धन व स्मारक उभारणेसाठी सविस्तर अंदाजपत्रक व आराखडे तयार करून पर्यटन संचालनालयाकडे तात्काळ पाठवण्याचे पत्र जिल्हाधिकारी पुणे यांना राज्याचे सहाय्यक संचालक पर्यटन यांनी मंगळवार दि. 2 मे 2023 रोजी पाठविले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मंत्री,भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री कार्यालयाने तात्काळ सूचना दिल्याने पर्यटन संचालनालय ॲक्शन मोडवर आले असून, मालोजीराजेंच्या गढीचे संवर्धन व स्मारक उभारणेचा प्रश्न लवकरच मार्गी लावणेसाठी शिवसेना-भाजप सरकारकडून हालचाली वाढल्या असून हर्षवर्धन पाटील यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हर्षवर्धन पाटील यांनी दि. 25 मार्च 2023 रोजी मुंबईत भेट घेऊन इंदापूर येथील वीरश्री मालोजीराजे यांच्या ऐतिहासिक गढीचे संवर्धन व स्मारक उभारणेसाठी चर्चा केली व पत्र दिले. त्यानुसार शासनाने संचालक पर्यटन संचालनालय महाराष्ट्र राज्य यांना दि.15 एप्रिल 2023 रोजी पत्र पाठवून या संदर्भातील सविस्तर अहवाल शासनास तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार राज्याचे सहाय्यक संचालक पर्यटन यांनी जिल्हाधिकारी पुणे यांना पत्र पाठवून वीरश्री मालोजीराजे यांच्या ऐतिहासिक गढीचे संवर्धन व स्मारक उभारणेसाठी सविस्तर अंदाजपत्रक, आराखडे पर्यटन विभागाकडे सादर करण्याचे पत्र पाठविले आहे. सदर पत्राची प्रत जिल्हा नियोजन अधिकारी पुणे यांनाही पर्यटन विभागाने पाठविली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांचे वास्तव्य असलेल्या गढीचे संवर्धन व स्मारकासाठी लागेल तेवढा निधी देण्यास शिवसेना-भाजप सरकार कटिबद्ध असल्याचा निर्वाळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यटन मंत्री मंगलप्रसाद लोढा, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे वीरश्री मालोजीराजे यांच्या ऐतिहासिक गढीचे संवर्धन व स्मारक उभारणेसाठी सातत्याने सहकार्य करीत असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
Home Uncategorized मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व हर्षवर्धन पाटील भेटीनंतर पर्यटन विभाग ॲक्शन मोडवर,मालोजीराजे गढी...