वैभव पाटील :प्रतिनिधी
पालघर तालुक्यातील सफाळे विभागातून एकनाथ शिंदे यांना गद्दार संबोधून बंडखोर शिंदे यांच्याविरोधात शिवनेरी कॉम्प्लेक्स येथे शिवसैनिकांनी एकत्र जमत निषेध व्यक्त केला. या निषेध मोर्चात जिल्ह्यातील शिवसैनिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
एकनाथ शिंदे यांना पालघर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी नेहमीच प्रेम, सन्मान दिला आहे. त्यांच्या आदेशानुसार अनेक निवडणुका लढवल्या आहेत. मात्र या बंडानंतर शिवसैनिक त्यांच्याबरोबर राहतील हा त्यांचा भ्रम असून इथला शिवसैनिक शिवसेनेबरोबरच राहणार आहे. तसेच जिल्ह्यातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहे. हा विश्वास देण्यासाठी संतप्त कट्टर शिवसैनिक ठिकाणी रस्त्यावर उतरला आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ज्यांची नेतेपदी नियुक्ती होते, त्यांना शिवसैनिक डोक्यावर घेतो. पण तोच नेता आमदार बनून शेण खातो तेव्हा त्याला चपलेने हाणल्या शिवाय इथला शिवसैनिक राहत नाही, असा जळजळीत टोला पालघर उपजिल्हा प्रमुख जगदीश धोडी यांनी आमदार श्रीनिवास वनगा यांचा समाचार घेताना यावेळी लगावला. श्रीनिवास वनगा हे लोकसभा निवडणुकीत हरले त्यानंतर त्यांना पुन्हा विधानसभा लढावयास दिली. आज तोच आमदार जिल्ह्यातून पळून गेला आहे. त्यामुळे ज्या दिवशी श्रीनिवास वनगा पालघरमध्ये येईल त्या दिवशी त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा जिल्ह्यातील शिवसैनिक त्यांचा राजीनामा घेतील असे सूचक आव्हान देखील यावेळी धोडी यांनी केले.
तर आज शिवसेना पक्षतील गद्दारांची घाण गेल्यामुळे उरलाय तो फक्त निष्ठावंत शिवसैनिक, कारण शिवसेनेत कोणताही आमदार, खासदार किंवा लोकप्रतिनिधी हा मोठा नाही सगळ्यात मोठा आहे तो शिवसैनिक असे मोठे पद बाळासाहेब ठाकरे यांनी यापूर्वीच घोषित केले होते. त्यामुळे सत्ता गेली तर आमदार, खासदार पळून जातील पण सच्चा शिवसैनिक मात्र हा नेहमीच जागेवर खंबीरपणे उभा राहणार आहे, असे परखड मत महिला आर्थिक विकास महामंडळ अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी शिवसेनेचे पालघर सहसंपर्कप्रमुख केतन काका पाटील, बोईसर विधानसभा समन्वयक अनुप पाटील, तालुका प्रमुख जयेश पाटील, उप तालुका प्रमुख नागेश वर्तक, संतोष घरत, नचिकेत पाटील, जिल्हा परिषद सदस्य सविता सुतार व सीमा रावते, पंचायत समिती सदस्य कामिनी पाटील व तुकाराम सुमडा, तालुका समन्वयक अजय ठाकूर, उपविभाग संघटक अजित गावड, प्रमुख वंदेश पाटील, प्रकाश गावड, मंगेश आक्रे यांच्यासह परिसरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.