इंदापूर:आज 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्री नारायणदास रामदास इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूर येथे समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार समारंभ तसेच शालेय विविध स्पर्धा पुरस्कारांचे वितरण समारंभ उत्साहाच्या वातावरणात पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंकिताभाभी शहा-माजी नगराध्यक्षा इंदापूर नगरपालिका ह्या होत्या. इंदापूर नगरपालिकेचे नाव भारतातील सर्वोत्तम नगरपालिकामध्ये नेहण्यासाठी अंकिताभाभी शहा यांचा सिंहाचा वाटा असल्याने त्यांच्यासह सौ माधुरी लडकत-इंदापूर पोलिस स्टेशनचे महिला अधिकारी यांचाही सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल अनिता खरात व रोहिणी राऊत यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी अध्यक्षीय भाषणात अंकिता शहा म्हणाल्या की,महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी, त्यांचे जीवन सुधारावे यासाठी ८ मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. आज महिला चौकटीबाहेर पडून जगाला गवसणी घालत आहेत. खेळापासून मनोरंनापर्यंत, राजकारण, लष्कर, संरक्षण मंत्रालयापर्यंत विविध मोठ्या भूमिका त्या बजावत आहेत. पण नेमकी महिला दिनाची सुरूवात कधी झाली? याबाबत विस्तृत स्वरूपात त्यांनी माहिती सांगितली की – अमेरिकेमध्ये १९०८ साली कामगार चळवळ झाली. त्यावेळी १५ हजार महिलांनी न्यूयॉर्कमध्ये मोर्चा काढून हक्कांसाठी आवाज उठवला. त्यांनी कामाचे तास कमी करावेत, मतदानाचा अधिकार द्यावा, वेतनश्रेणी वाढवावी अश्या अनेक मागण्या केल्या. त्याची दखल त्यावेळच्या सरकारने घेतली. १९०९ मध्ये अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने महिला दिन साजरा केला जाणार असल्याची घोषणा केली. तो मोर्चा ८ मार्च रोजी काढण्यात आला होता. त्यानंतर महिला दिनाची सुरूवात झाली.यावेळी इंदापूर पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सौ माधुरी लटकत म्हणाल्या की,स्त्रियांनी निर्भीडपणे समाजात वावरले पाहिजे कोणीही अन्याय करत असेल तर त्याला वाचा फोडण्यासाठी कायदेशीर मार्गाने व पोलिसांची मदत घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अनिता खरात व रोहिणी राऊत यांनीही महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.महिला दिनाचे औचित्य साधून शालेय विविध स्पर्धा पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .तसेच शाळेमधील अनेक विद्यार्थ्यांनी भारतात विविध क्षेत्रांमध्ये नावारूपाला आलेल्या कर्तृत्ववान महिलांची भूमिका व त्यांची वेशभूषा करून त्यांची माहिती मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयश्री झगडे यांनी केले. तसेच सूत्रसंचालन वर्षा सुतार व सुप्रिया खीलारे यांनी केले. त्याचबरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका फौजिया शेख यांनी देखील महिला दिनाचे महत्त्व मुलांना सांगून सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.आभार वर्षाराणी गाडे यांनी मानले. हा संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेतील शालेय सांस्कृतिक विभागाचा वाटा मोलाचा आहे.अशाप्रकारे श्री नारायणदास रामदास इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.