इंदापूर: मराठा सेवा संघाचा ३२ वा वर्धापनदिन हा मराठा सेवा संघ इंदापूरच्या वतीने साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम हा सरडेवाडी येथील ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेजमध्ये साजरा करण्यात आला.मराठा सेवा संघाची स्थापना ही दि. १ सप्टेंबर १९९० रोजी सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असणारे मुख्य अभियंता शिवश्री पुरूषोत्तम खेडेकर साहेब यांनी अकोला या ठिकाणी केली.
मराठा सेवा संघ हा धर्मसत्ता, राजसत्ता, शिक्षण सत्ता, अर्थ सत्ता, प्रचार- प्रसार माध्यम सत्ता या पंचसुत्रीनुसार गेली ३२ वर्षे काम करत आहे. मराठा सेवा संघाचे एकूण ३२ कक्ष कार्यरत आहेत. इतिहास पुनर्लेखन, वैज्ञानिक दृष्टिकोन, राष्ट्रमाता जिजाऊ यांचे तैलचित्र, १९ फेब्रुवारी ही अधिकृत शिवजयंतीची तारीख, १२ जानेवारी सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सव,१९ फेब्रुवारी किल्ले शिवनेरीवर शिवजयंती, १४ मे किल्ले पुरंदर संभाजी महाराज जयंती, ६ जून शिवराज्याभिषेक दिन,तसेच प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी मोफत वसतीगृह, यावरती काम करत आलेला आहे. मराठा सेवा संघामध्ये आतापर्यंत शेकडो इतिहासकार, लेखक, वक्ते तयार झालेले आहेत.दि. ४ सप्टेंबर २०२२ रोजी मराठा सेवा संघ इंदापूर च्या वतीने मराठा सेवा संघाचा ३२ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ही जिजाऊ पूजन व जिजाऊ वंदना म्हणून करण्यात आली. इंदापूर तालुक्यातील एक विद्यार्थी शिवमान विजय देवकाते याने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याच्या कुटूंबियांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंडल कृषी अधिकारी शिवश्री गणेश सुर्यवंशी हे लाभले होते. कार्यक्रमाला उपस्थित सर्वांना एक वैचारिक पुस्तक भेट म्हणून देण्यात आले.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मराठा सेवा संघ इंदापूर च्या सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.