मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या श्री.मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी एकवटलेल्या मराठा समाज बांधवांवर झालेला लाटीचार्ज ही अत्यंत दुर्दैवी घटना असून लोकशाही मार्गाने आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या माता-भगिनी,अबालवृद्ध तसेच शालेय विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करणाऱ्या पोलीस प्रशासनावर तातडीने कारवाई झाली पाहीजे,अशी ठाम भुमिका घेत माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी निषेध व्यक्त केला आहे.या विषयी बोलताना आमदार भरणे म्हणाले की,आंतरवाली सराटी ता.अंबड जि.जालना या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी मराठा आरक्षण समितीचे समन्वयक श्री. मनोज जरांगे पाटील व त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत.वास्तविक पाहता लोकशाहीमध्ये प्रत्येक घटकाला आपल्या न्याय हक्कासाठी लढण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे.यापूर्वी मराठा समाज बांधवांनी आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंचे मोर्चे अतिशय शिस्तबद्ध आणि शांततेत काढले आहेत,याची जगाने नोंद घेतली आहे.त्यामुळे आरक्षणाच्या आंदोलनाला कुठलाही गालबोट लागणार नाही याची काळजी घेत गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे – पाटील हे सहकऱ्यांसह त्याठिकाणी उपोषणाला बसले आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आसपासच्या भागातील हजारो मराठा समाज बांधव एकत्र येऊन आपल्या हक्काची लढाई लढतोय.मात्र असे असताना काल प्रशासनाने त्यांचे आंदोलन मोडीत काढण्याच्या हेतूने उपस्थित जमावावर अचानकपणे लाठीचार्ज करण्याचा अमानुष प्रकार घडला असून मराठा समाजावर झालेला लाटीचार्ज हा अत्यंत चुकीचा असून यामध्ये शेकडो बांधव जखमी झाले आहेत.त्यामुळे या घटनेचा आमदार भरणे यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.तसेच या प्रकरणी ते उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलून घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या त्वरित निलंबनाची मागणी करणार असल्याची माहिती आमदार भरणे यांनी दिली.
Home Uncategorized मराठा समाज बांधवांवर झालेला लाटीचार्ज ही अत्यंत दुर्देवी घटना-आ.दत्तात्रय भरणे यांच्याकडून निषेध...