🙏🙏दिवंगत तात्यांना ७१ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!.
👉नव्हती हातात छनी, हातोडा होती फक्त लेखणी अन् वाणीला धार.
👉शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी संघर्ष नाही सोडला.
दिवंगत पँथर रत्नाकर मल्हारी मखरे यांचा जन्म ९ जुलै १९५१ रोजी झाला.ते “तात्या” ह्या नावाने जनमानसात परिचित होते.
नेतृत्व आणि वक्तृत्वाचा मिलाफ म्हणजेच तात्या. जाती धर्म बाजूला सारून केवळ माणसाला माणूस म्हणून बघून कार्य करणारे व्यक्ती बोटावर मोजण्याइतके असतात. आजच्या राजकारणात आणि समाजकारणात धर्मांध आणि जातंध्यांची चलती आहे.मात्र शिव, फुले,शाहू, आंबेडकरी विचारांची कास धरून सामाजिक, राजकीय क्षेत्रात प्रभावी वाटचाल करणारे व्यक्ती म्हणजे तात्या. त्यांची विशेष ओळख म्हणजे राजकारणा पलीकडे पाहणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनच राहिली. अनेक वर्षापासून नानाविध अध्यायांचा इतिहास,हृदय आणि श्वासांच्या नात्याइतका एकरुपतेने सामावला गेला आहे.तात्यांची राजकीय सुरुवात सन- १९७४ पासून नगरपालिकेत नगरसेवक निवडीने झाली.१२ डिसेंबर १९९० ला नगरसेवकांमधून नगराध्यक्षपदी तात्यांची निवड झाली. नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक विकासाच्या योजना राबविल्या. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्ध पुतळे नगरपालिका मैदानात बसविले . नगरपालिकेतील रोजंदारीवरील ३८ कामगारांना न्यायालयाच्या माध्यमातून कायम केले. पालिकेशेजारी जि. प.शाळेला नवीन खोल्या बांधल्या. उद्योग धंद्यासाठी नागरिकांना गाळे काढून दिले.न पा. च्या तळ्यात स्विमिंग पुल बांधण्याची तात्यांची इच्छा होती. तसेच आधुनिक पद्धतीचा बगीचा बनविण्याचा संकल्प होता. परंतु ते स्वप्न अपूर्ण राहिले याची खंत तात्यांना नक्कीच राहिली. महाराष्ट्रातील नामांकित कारभार चालवणारे नगराध्यक्ष म्हणून तात्यांना बहुमान मिळाला. तात्यांना त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत नगरपालिकेच्या कर्मचारी वर्गानी प्रचंड साथ दिली.
तात्यांनी राजकीय जीवनात भाजपा मध्ये देखील काही काळ काम केले. पण त्यात ते रमले नाहीत.मा. एम. बी. मिसाळ (नाना) यांच्या व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव भारतीय दलित पँथर मध्ये राजकीय सुरुवात झाली. आक्रमकतेने काम, आंदोलने उभारली. समाजासाठी काहीतरी वेगळं काम करण्याची तात्यांची तयारी असायची वेळप्रसंगी तुरुंगवास भोगावा लागला. राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले साहेबांशी घनिष्ठ संबंध आले. आठवले साहेबांबरोबर तात्यांनी महाराष्ट्रभर दौरे केले.त्यांची घणाघाती भाषणं व्हायची. अन्याया विरूद्ध लढतांना नवी ऊर्जा मिळायची .पुढे दलित पँथरचे जिल्हाध्यक्ष, आरपीआय जिल्हाध्यक्ष अशा एक ना अनेक जबाबदाऱ्या तात्यांनी निडर पणे पार पाडल्या.
तात्यांच्या भाषणाची सुरुवात बहुजन महापुरुषांची नावे घेऊन संथ गतीने होवून नंतर वीजेची दाहकता ओकत असलेल्या शब्दांत भाषण अनेक उदाहरणासह देतं.त्यांचे शब्द व बोलणारे तात्या समजायला लागले.हजारो जीभांनी तात्यांची वेगवेगळी व्याख्या केलेली आहे.मात्र तात्या हे कुटुंबवत्सल होते.हळवे कवी मन व झुंजार कार्यकर्ते या त्यांच्या दोन बाजू होत्या.त्यांनी आयुष्यात कधी काही दडवलं नाही.खुल्लमखुल्ला मोकळेपणानं आरशासारखं स्पष्ट बोलायचे. खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणणारे स्पष्ट वक्ते, सार्वजनिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे, प्रचंड इच्छाशक्ती, नाविन्याचा ध्यास घेणारे, आपल्या कार्यकर्तृत्वाने आपलेसे करणारे प्रेरणास्थान म्हणजे तात्या. दूरदृष्टीने झपाटून काम करणारं गतिमान नेतृत्व म्हणजे तात्या..तात्यांनी मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ह्या संस्थेला स्वतः च्या मालकीची ५.१/२ एकर जमीन वापरासाठी दिली आहे. त्याठिकाणी शाळेच्या भव्य दिव्य अशा देखण्या इमारती अगदी दिमाखात डौलत आहेत.इ.१ली ते इ.१२ चे विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात शिक्षण घेतात. निवासी खोल्या मुला- मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहेत.एकूण ३६८ विद्यार्थी निवासी राहतात. अनिवासी विद्यार्थी शहरातून शिक्षणासाठी शाळेत येतात. शालेय संकुलाला तात्यांनी स्वतः च्या आई वडिलांचे नाव न देता बहुजन महापुरुष व महामातांची नावे देऊन नवा आदर्श घालून दिला.संस्थेचे अंतर्गत १)भिमाई प्राथमिक आश्रमशाळा. २) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक आश्रमशाळा. ३) राजमाता अहिल्यादेवी होळकर कनिष्ठ महाविद्यालय. ४) मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह.५) शेख फातिमा मुलींचे अनुदानित वसतिगृह अशी नावे प्रत्येक विभागाला दिलेली आहेत. त्या संपूर्ण परिसराला जिजाऊ नगर हे नाव दिलेले आहे. ह्या शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थ्यांचे भवितव्य घडले.तात्या चांगल्या कामाची पावती म्हणून शाबासकीची थाप पाठीवर द्यायचे. हा माझा स्व:अनुभव आहे.तात्या उभ्या आयुष्यात कोणालाच शरण गेले नाहीत. असं व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही.
आदरणीय तात्यांना ७१ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!
अभिवादक :- श्री. नानासाहेब सानप सर, इंदापूर