तुळजापूर | यापूर्वी आपण अनेक यशोगाथा ऐकलेल्या,पाहिलेल्या आहेत परंतु एका नोकरदराने केलेली शेती व त्या शेतीतून मिळणारे लाखो रुपयांचे उत्पन्न ही दुर्मिळ यशोगाथा आपण ऐकले नसेल. शेती हा पावसाच्या पाण्यावर जास्तीत जास्त अवलंबून असणार व्यवसाय आहे. भारताला कृषीप्रधान देश म्हटलं जात असलं तरी सर्वाधिक शेतकरी आत्महत्या सुद्ध आपल्या देशात होतात.शेती हा व्यवसाय आता तंत्रज्ञानाच्या आणि आधुनिकतेच्या जोरावर केला जात आहे. परिणामी अनेकजण या आधुनिक शेतीद्वारे मोठ्या प्रमाणात फायदा मिळवत आहेत.पावसाच्या किंवा नदीच्या पाण्यावर महाराष्ट्रात शेती केली जाते. पण मराठवाडा, सोलापूर, विदर्भ या भागात शेतीसाठी सिंचन पद्धतीवर भर देण्यात येत आहे.
अशीच आधुनिक शेती करत भरपूर फायदा मिळवणाऱ्या मसला खुर्द येथील सुशिक्षित शेतकरी सोमेश वैद्य यांची पेरू बाग शेती सध्या प्रचंड गाजत आहे. त्यांनी 10 एकर शेतीमध्ये पेरूचं उत्पादन घेऊन वर्षभरात 25 लाख कमावले आहेत.
तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द गावातील सुशिक्षित शेतकरी अँड सोमेश वैद्य व कुटुंबाने कोरोना लॉकडाऊनचा फायदा करीत गेल्या जून 2020 मधे तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द गावात 5 एकर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डि गावात 5 एकर थाई 7 आणि पिंक सुपर वाण जातीचा पेरू बाग व्यक्तिश स्वतः लक्ष घालून लागवड केली होती .गेल्या 18 महिन्यात त्यानी पेरू बाग अत्यंत चांगली जोपासली असून ठिबक सिंचन द्वारे खते व पाणी झाडास उपलब्ध करून अत्यंत योग्य नियोजनद्वारे 10 हजार पेरू झाडाचे उत्तम संगोपन केलं आहे.
शेताला कायम स्वरूपी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी त्यानी आधुनिक पद्धतीनं 1 एकरमध्ये शेततळे बांधले असून 2 विहीरद्वारे मुबलक पाणी साठा केला आहे.अत्यंत नियोजनबद्द शेती त्यानी विकसित केली असल्याचे प्रत्यक्ष शेती पाहणी करीत विविध तज्ज्ञांनी आपली मतं व्यक्त केली आहेत.गेल्या तीन महिन्यापासून पेरू उत्पादन सुरू असून आतापर्यंत त्यानी 100 टन पेरू सोलापूर ,उस्मनाबाद, लातूर बेळगाव,अहमदनगर येथील व्यापारी आणि बाजार समिति मधे विकून 25 लाखाचे उत्पादन मिळवले आहे.
वैद्य यांच्या या पेरू लागवडीमुळं परिसरातील गरजू व्यक्ती आणि महिलांना नियमित रोजगार उपलब्ध करून दिला आहे. याबाबत श्री वैद्य यांचे परिसरातील शेतकरी कडून कौतूक केले जात आहे.
सोमेश वैद्य हे गेल्या 15 वर्षापासून मंत्रालय विधानभवन स्वीय सहायक पदावर कार्यरत असून ते सध्या भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांचे स्वीय सहायक म्हणून विधानभवन मुंबई येथे कार्यरत आहेत.पेरू बाग शिवाय त्यानी त्यांच्या उर्वरित शेतात कोकणातील जातिवंत केशर आंबा दोन हजार झाडे आणि सिताफळ बाग लागवड केली असून त्याचे उत्पादन येत्या 2 वर्षात मिळेल असे त्यानी सांगितले आहे.दरम्यान, मराठवाडा आणि सोलापूरसारख्या भागात वैद्य यांनी आपल्या नियोजनबद्ध शेतीच्या माध्यमातून पारंपारिक शेतीला पर्याय उभा केला आहे.