इंदापूर(प्रतिनिधी):अनेक वर्षापासून पिठेवाडी गाव विकासापासून वंचित आहे.मात्र सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली या गावचा विकासात्मक कायापालट करण्यासाठी आगामी काळात यशस्वी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही,गावचे नूतन सरपंच समाधान जानकर यांनी दिली.इंदापूर तालुक्यातील पिठेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच कमल बुरुंगले यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा सरपंच पदाचा दिला होता.त्यामुळे देण्यात आलेल्या सरपंच पदाच्या निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने समाधान जानकर व भाजपचे रामचंद्र मासाळ यांनी सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे समाधान जानकर यांना पाच मते मिळाली तर,भाजपचे रामचंद्र मासाळ यांना दोन मतदान मिळाले.त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा बावड्याचे मंडलाधिकारी उदयसिंह कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे समाधान जानकर यांना सरपंच म्हणून घोषित केले.यावेळी गावकऱ्यांच्या वतीने आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यात नूतन सरपंच समाधान जानकर बोलत होते.पुढे बोलताना सरपंच समाधान जानकर म्हणाले की,पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये सरपंच होण्याचा अवघ्या 27 व्या वर्षी मला मान मिळाला आहे.त्यामुळे सामान्य जनतेच्या विकासासाठी अहोरात्र काम केले जाईल. गावातील अंतर्गत रस्ते बंदिस्त गटारे तसेच ग्रामदैवत असलेल्या बिरोबा मंदिर व मारुती मंदिराचा जीर्णोद्धार व अद्यावत ग्रामपंचायत कार्यालय उभारणी, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून करण्यासाठी कटिबद्ध असणार आहे.पिठेवाडी गाव हे अवघ्या एक हजार लोकवस्तीचे आहे मात्र तीनही प्रभागात विकास करताना दुजाभाव करणार नाही गावातील प्रत्येक नागरिकाला विश्वासात घेऊन गावचा विकास केला जाईल.यासाठी मला सर्व गावकरी मनापासून साथ देतील असाही विश्वास नूतन सरपंच समाधान जानकर यांनी व्यक्त केला आहे.यावेळी गावचे ज्येष्ठ नेते महादेव शेडगे,आप्पा बुरुंगले,दादासो शेंडगे, नानासाहेब शेंडगे तसेच ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच कोमल बुरुंगले वैभव,होनकडे,सिंधुनाना शेंडगे,मनिषा जानकर,बळीराम डोंबाळे,दादा जानकर, साधूनाना शेंबडे, विजय शेंबडे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.