वैभव पाटील :पालघर प्रतिनिधी
पालघर: पालघर तालुक्यातील खडकोळी गावात चिकनगुनियाचा एक रुग्ण आढळून आला आहे. गावात तापाची साथ पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाच नागरिकांना तापाची लागण आहे. त्यातील काहींना हा आजार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांचे अहवाल तपासणीसाठी डहाणू प्रयोगशाळेत पाठवले आहेत. ते आल्यानंतरच त्यांना चिकणगुनिया आहे किंवा नाही हे समजणार आहे.
खडकोली गावाची लोकसंख्या १०२३ असून २०७ घरे आहेत. गेल्या दोन-तीन दिवसापासून गावातील अनेकांना तापाची लागण झाली आहे. अनेकांना अंगदुखी सारख्या लक्षणांना सुरुवात झाली आहे. यातील रुग्णांपैकी एका रुग्णाच्या तपासणी अहवालात तो चिकनगुनियाने बाधित असल्याचे समजले. त्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.