पालखी मार्गाच्या निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करा- हर्षवर्धन पाटील यांची नितीन गडकरी यांना मागणी.

इंदापूर : नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि.14) भेट घेऊन तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या दर्जाहीन कामाबरोबरच विविध विषयांवरही चर्चा केली. याभेटीमध्ये संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम निकषानुसार गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे, निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी व मार्गाचे काम लवकर पुर्ण होणेसाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा, अशी चर्चा झाली. यासंबंधीचे निवेदन हर्षवर्धन पाटील यांनी मंत्री गडकरी यांना दिले.
पालखी मार्गाचे काम दर्जेदार झाले पाहिजे, अशी कडक भूमिका ना.नितीन गडकरी यांची आहे. मंत्री गडकरी हे रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत कधीही तडजोड करीत नाही. मात्र पालखी मार्गाच्या निकृष्ट कामाबाबत जनतेच्या अनेक तक्रारी येत आहेत. संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामाची ना. गडकरी यांनी स्वतंत्रपणे दौरा काढून पाहणी करावी, शेतकऱ्यांना भूसंपादनाची रक्कम मिळणेसाठी वाद वादविवादाचे दावे लवकर निघाली काढण्यात यावेत, या संदर्भातही हर्षवर्धन पाटील यांनी ना. गडकरी यांचेशी चर्चा केली.
कामाच्या ठिकाणी फलक व इतर रस्ता सुरक्षिततेच्या नियमांचे कंत्राटदारांकडून पालन केले जात नसल्याने सतत अपघात होऊन अनेकांना जीव गमावावे लागले आहेत. पालखी मार्गाच्या अपूर्ण कामांमुळे जनतेची गैरसोय होत आहे. त्यामुळे पालखी मार्गाची गुणवत्तापूर्ण अशी कामे वेळेत पूर्ण व्हावीत, अशी मागणीही मंत्री नितीन गडकरी यांचेकडे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी केली.तसेच या भेटीत इथेनॉल, साखर उत्पादन यासह विविध विषयांवर चर्चा झाली. याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशन नवी दिल्लीच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे उपस्थित होत्या.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here