पवारांच्या बारामतीत गुंडाराज…मद्यधुंद अवस्थेत कोयाताधारी गुंडांचा धिंगाणा,बारामती जगतेय दहशतीच्या वातावरणात..

बारामती हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,खासदार सुप्रियाताई सुळे, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचा बालेकिल्ला…अनेक विकासात्मक धोरणे राबवून महाराष्ट्रात बारामती या शहराने आपली नवीन ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे बारामतीकरांना आपल्या गावाचा खूप अभिमान आहे असं पहावयास मिळत पण हेच बारामतीकर आता दहशतीच्या वातावरणात जगत आहेत असेच चित्र आता समोर येत आहे. इथली कायदा व सुव्यवस्था नेमकी कुठं आहे याचा प्रश्न पडावा असंच सध्या चित्र आहे.बारामतीत मद्यधुंद अवस्थेतील चार ते पाच जणांनी दोन दुचाकीवरुन हातात कोयते घेत आज शहरातील पाचहून अधिक हॉटेलमध्ये धुमाकूळ घातला. अनेक हॉटेलच्या त्यांनी काचा फोडून नुकसान केले असून काही दुचाकींसह चारचाकी वाहनांचं देखील मोठं नुकसान केले आहे. त्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.बारामतीत कायद्याचं राज्य आहे की नाही असा प्रश्न पडावा अशा या घटनेनंतर शहरात नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे.संध्याकाळी सातच्या सुमारास एमआयडीसी परिसरातील रेल्वे गेटनजिक या टोळक्यानं एकाचा मोबाईल हिसकावत एका दुकानाची मोडतोड केली. तिथून पाटस रस्त्यावरील सराफ पेट्रोलपंपावर पेट्रोल टाकून पैसे मागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोयत्याने हल्ला केला, मात्र त्याने तो चुकवल्याने पेट्रोल भरण्यास आलेल्या एका व्यक्तीला कोयता लागल्याची प्राथमिक माहिती आहे.त्यानंतर तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयासमोरील दुकान व हॉटेलमध्ये घुसून भांडणे करीत मोडतोड केली. तिथल्या चार चाकी वाहनांच्या काचा फोडल्या, या शिवाय एकावर हल्ला केल्यानंतर त्याच्या हाताला कोयत्याची दुखापत झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानंतर दुचाकीवरुन हातात कोयते दाखवत गावभर हे युवक फिरत होते.काही दुकानांच्या सीसीटीव्हीत ही दृश्य कैद झाली आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ हालचाल करत दोन युवकांना जेरबंद केले असून त्यांनी कुठे कुठे काय नुकसान केलेले आहे याची माहिती पोलिस घेत आहेत.
हे युवक मद्यधुंद अवस्थेत दिसत असून गाडीवर कोयते दाखवत शहरभर फिरत होते. तसेच दिसेल त्या गाडीवर काही ठिकाणी त्यांनी कोयत्यांनी वार केले. यामुळं गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या प्रकरणी पोलिस आता तपास करत आहेत. मात्र यानिमित्तानं बारामतीतील कायदा आणि सुव्यवस्थेवर मात्र प्रश्नचिन्ह लागलं आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कार्यक्षेत्रात अशी घटना घडल्यानं मोठी चर्चा सुरु आहे.आता यानंतर असे प्रकार घडू नयेत म्हणून पोलीस प्रशासन कशा पद्धतीने उपाययोजना करेल यावरच बारामतीची सुरक्षितता अवलंबून आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here