पदाच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा करावी – माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिल्या गुणवंतांना शुभेच्छा.

आपला इंदापूर तालुका अनेक क्षेत्रामध्ये राज्यामध्ये अग्रेसर असताना स्पर्धा परीक्षेमध्ये सुध्दा आपल्या तालुक्यातील अनेक गुणवंतांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेमध्ये (MPSC) घवघवीत यश संपादन केले आहे.या सर्व गुणवंतांचा आपल्या सर्वांना रास्त अभिमान असुन त्यांनी आपल्या पदाच्या माध्यमातुन गोरगरिबांची तसेच उपेक्षित घटकाची सेवा करावी अशी अपेक्षा माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केली.
नुकताच भरणेवाडी येथे स्पर्धा परिक्षेमध्ये उतीर्ण झाल्याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता,यावेळी आमदार भरणे बोलत होते.ते म्हणाले की,इंदापूर तालुक्यातील शेटफळ गढेच्या पूनम झगडे,कचरवाडी (बावडा) येथील सागर मुळीक व अभिजीत मुळीक हे सख्खे बंधु तसेच शिरसोडीच्या विकास व्यवहारे यांनी अतिशय जिद्द,चिकाटी व मेहनतीच्या जोरावर स्पर्धा परिक्षेमध्ये उज्वल यश मिळवले आहे.अर्थात यामध्ये आईवडील,भाऊ-बहिण तसेच गुरूजनांचा खूप मोठा वाटा असल्याचे भरणे यांनी सांगितले.
यावेळी गुणवंतांचा सत्कार करत असताना भरणे पुढे म्हणाले की,आज आपल्या ग्रामीण भागातील अगदी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या विद्यार्थांनी मिळवलेले यश हे निश्चितपणे अनेकांना दिशादर्शक व प्रेरणादायी ठरेल यात तीळमात्र शंका नसुन या विद्यार्थांनी तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये आपण सामान्य प्रशासन राज्यमंत्री असताना अनेक विद्यार्थी हिताचे निर्णय घेतल्याने याचा स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणा-या असंख्य विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे याचे खूप मोठे समाधान असल्याचे भरणे यांनी सांगत या पुढेही स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थांना आवश्यक ती मदत केली जाईल असेही ते म्हणाले.
या वेळी सत्कारास उत्तर देताना भावी अधिकाऱ्यांनी सांगितले की,आदरणीय भरणेमामा सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री असताना त्यांनी आमच्या हिताचे अनेक निर्णय घेऊन भरती प्रक्रिया वेगाने राबविल्याने आज आम्ही यशापर्यंत पोहचलो आहे.या निमित्ताने आम्ही स्पर्धापरिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगु इच्छीतो की,जिवनामध्ये अशक्य काहीच नाही.स्पर्धा परिक्षांबाबत कोणताही न्युनगंड न बाळगता एक ध्येयवादी दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी अथक व अविरत परिश्रम घेतल्यास तुम्हाला यश हमखास मिळेल हा संदेशही यावेळी त्यांनी दिला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here