पंढरपूर तालुक्यात प्रशांत परिचारक यांचेच पारडे सध्या जड, विरोधक प्रचंड बॅकफूटवर..

पंढरपूर (सोलापूर) : महाराष्ट्रात सध्या नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत.राज्यात कॉंग्रेस ,राष्ट्रवादी कॉंग्रेस  व शिवेसना एकत्रितपणे निवडणुका लढवणार, अशी चर्चा सुरू असतानाच पंढरपुरात मात्र राष्ट्रवादीसह सत्तेतील तिन्ही पक्ष बॅकफूटवर गेले आहेत. दरम्यान, पंढरपूर नगरपालिकेतील  सत्ताधारी भाजप प्रणीत शहर विकास आघाडीचे तगडे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते कसे पेलणार, याचीच चर्चा सुरू झाली आहे.आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्या पांडुरंग परिवाराने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. नगरपालिकेतील व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी देखील सुरू केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेना या तिन्ही सत्ताधारी पक्षांतील नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने सध्यातरी परिचारक विरोधी गटात कोणत्याच हालचाली दिसून येत नाहीत.
‘विठ्ठल’चे संचालक युवराज पाटील यांनी मात्र ग्रामीण भागात बैठका सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादीचे अन्य नेते मात्र अजूनही शांतच आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजप आमदार प्रशांत परिचारकांचे  आव्हान पेलवणार का, याविषयी आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
नगरपालिकेत गेल्या साडेसात वर्षांपासून परिचारक गटाची एकहाती सत्ता आहे. आमदार प्रशांत परिचारक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात शहरासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून विकासकामे केली आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडूनही अनेक रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत. शहरातील प्रदक्षिणा मार्गासाठीही निधी मंजूर केला आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांची कामे मार्गी लावण्यात परिचारकांना काही प्रमाणात यश आले आहे. त्यामुळे आमदार परिचारक व नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याविषयी शहरवासीयांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.तर दुसरीकडे, विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये समन्वय नसल्याने आमदार परिचारक यांच्या विरोधात सक्षम विरोधी नेता तयार करण्यात अद्याप यश आले नाही. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे सारथ्य कोण करणार, याविषयी उत्सुकता लागली आहे. राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांचा भाळवणी जिल्हा परिषद गटापुरता प्रभाव मर्यादित असल्याने ते संपूर्ण तालुक्‍यात व पंढरपूर शहरात राष्ट्रवादीची कशी व किती ताकद वाढवतात, यावरही तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांचा मागील काही महिन्यांपासून शेतकऱ्यांशी व कार्यकर्त्यांशी संपर्क नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचा पाय अधिकच खोलात गेला आहे. त्यातच विठ्ठल साखर कारखाना यंदा बंद असल्याने त्याचा फटकाही राष्ट्रवादी कॉंग्रेसला बसण्याची शक्‍यता आहे. आमदार भारत भालके  यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी एक वर्षानंतरही कायम आहे. सक्षम नेत्याविना दिशाहीन झालेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आगामी निवडणुकीत आमदार परिचारकांच्या विरोधात कशी टक्कर देणार, हे पाहणे आता महत्त्वाचे राहणार आहे.
कॉंग्रेसची अवस्था तर अत्यंत दयनीय आहे. काही मोजक्‍या पदाधिकाऱ्यांमुळे शहर व तालुक्‍यात कॉंग्रेसचे अस्तित्व टिकून आहे. कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील हे कॉंग्रेससाठी असून नसल्यासारखे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याकडे तालुकाध्यक्षपद आहे; मात्र ते पक्षाच्या कार्यक्रमात किंवा आंदोलनात कुठेच सक्रिय होताना दिसत नाहीत. शिवसेनेचे पंढरपूर जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे व शहरप्रमुख रवी मुळे, जयवंत माने, सुधीर अभंगराव यांसारख्या मोजक्‍या कार्यकर्त्यांवरच सेनेची मदार अवलंबून आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here