नव जन्मलेल्या चिमुकलीला आणले हेलिकॅप्टर मधून घरी..मुलगी झाल्याने पालकांचा अनोखा आनंदोत्सव व जंगी स्वागत

पिंपरी: मुलगी झाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी तिला हेलिकॉप्टरमधून वाजतगाजत घरी आणण्यात आले. फुलांची उधळण करतानाच स्वागतासाठी घरासमोर फुलांच्या पायघडय़ा टाकण्यात आल्या.खेड तालुक्यामधील शेलगावातील झरेकर कुटुंबियांचा हा आनंदोत्सव पंचक्रोशीत चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे.
वंशाला दिवा म्हणून मुलगाच व्हावा, अशी इच्छा असणाऱ्या सध्याच्या काळातही ‘मुलगी झाली, प्रगती झाली’ असे म्हणत आनंद व्यक्त करणारे अनेक पालक दिसून येतात. वेगवेगळय़ा पध्दतीने त्यांनी साजरा केलेला आनंदोत्सवही वेळोवेळी चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, मुलगी झाल्यानंतर तिला चक्क हेलिकॉप्टरमध्ये बसवून घरी आणण्याचे दुर्मिळ उदाहरण शेलगावात घडले आहे.
येथील रहिवासी अ‍ॅड. विशाल झरेकर यांना २२ जानेवारीला कन्यारत्न झाले. तिचे नाव राजलक्ष्मी असे ठेवण्यात आले. ती भोसरीत आजोळी होती. तेथून तिला घरी आणण्यासाठी झरेकर यांनी भाडेदराने हेलिकॉप्टर ठरवले. भोसरीतून थेट जेजुरीला जाण्याचा झरेकर कुटुंबियांचा मानस होता. मात्र, तेथे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी परवानगी नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी शेलगावकडे जाण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत गावात हेलिकॉप्टर येणार असल्याची बातमी पसरली होती. त्यामुळे हेलिकॉप्टर आणि मुलीला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. शेतात तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या हेलिपॅडवर हे हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. तेव्हा झरेकर कुटुंबियांसह उपस्थितांनी आई आणि बाळावर फुलांची उधळण केली. तेथून घरापर्यंतच्या मार्गावर पायघडय़ा घालण्यात आल्या होत्या. झरेकर कुटुंबियांनी केलेले मुलीच्या जन्माचे स्वागत व आनंदोत्सव परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.
“समाजात मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा आणि स्त्री जन्माचे स्वागत केले जावे , हा संदेश समाजात पोहोचवण्याच्या हेतूने अशाप्रकारे आनंदोत्सव साजरा केला.”
– अ‍ॅड. विशाल झरेकर

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here