पुणे, ता. २५: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेला गती आली आहे. वर्षभरात रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ज्या प्रमाणे तुमच्या आई वडिलांना तुमची काळजी आहे. तशीच मलाही आहे. कोणत्याही प्रकारची काळजी करू नका. या वर्षात खूप परीक्षा घेयच्या आहेत. त्यामुळे केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. असा संदेश सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना दिला.
अर्हम फाउंडेशन आणि वास्तव कट्टा संयुक्त विद्यामाने आयोजित ‘स्पर्धा परीक्षा : वास्तव, भवितव्य आणि दिशा’ या विषयावर ‘संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भरणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. माजी प्रशासकीय अधिकारी महेश झगडे, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया, अहिल्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश शेंडगे, महेश बडे, किरण निंभोरे याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
भरणे म्हणाले की, ‘‘कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात भरती प्रक्रिया लांबली होती. मात्र आता राज्यातील सर्वच विभागातील रिक्त जागांची माहिती घेण्यात आली आहे. त्यानुसार सुमारे १५ हजार जागा भरल्या जाणार आहेत. त्यापैकी आता पर्यत सुमारे ८ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु देखील झाली आहे. तसेच राहिलेल्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.’’
परीक्षांबाबत कोणताही गोंधळ आता होणार नाही. आता पर्यतच्या इतिहासात राज्याने भरतीच्या ३०० जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. वर्षभरात सर्व रिक्त पदे भरली जाऊन नेमणुकाही दिल्या जातील. असे आश्वासन यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. तसेच मोठा भाऊ या नात्याने आपल्यासाठी काम करेल, असे भावनिक होत सांगितले.
शासकीय पदे भविष्यात कमी होत जाणार आहेत. केवळ २.७ टक्के सरकारी नोकऱ्या राहिल्या आहेत. तर खासगी क्षेत्रात ९५ टक्के नोकऱ्या आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांकडे प्लॅन ‘बी’म्हणून बघा. असा सल्ला माजी प्रशासकीय अधिकारी महेश झगडे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
अर्हम फाउंडेशन आणि वास्तव कट्टा संयुक्त विद्यामाने आयोजित ‘स्पर्धा परीक्षा : वास्तव, भवितव्य आणि दिशा’ या विषयावर ‘संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झगडे बोलत होते.
राज्यात किती पदे रिक्त आहेत, याची माहितीच नाही. त्यामुळे भरती प्रक्रिया राबवण्यास अडचण येते. राज्यातील सर्व खात्यांना रिक्त पदांचा आढावा घेण्यास सांगावे. आणि एक वर्ष आधीच रिक्त पदांची माहिती जमा करावी. जे अधिकारी ही माहिती सादर करणार नाहीत. त्यांचे कान टोचावेत. तसेच असलेली रिक्त पदे भरावीत अथवा ती थेट रद्द करावीत. अशी मागणी झगडे यांनी भरणे यांच्याकडे केली. सध्या आरोग्य विभागांसह इतर विभागांच्या परीक्षांचा गोंधळ पाहता, सर्व प्रकारच्या परीक्षा एमपीएससीकडे द्याव्यात. खासगी कंपन्यांना पैसे देण्याऐवजी एमपीएससीची कार्यक्षमता वाढविण्यात येऊन जिल्हास्तरावर उपकेंद्रे सुरु करावीत. त्यामुळे भरती प्रक्रियेला कायमस्वरूपी मदत होईल. असा सल्ला झगडे यांनी सरकारला उद्देशून भरणे यांना दिला. तसेच यासाठी कोणत्याही मानधनाशिवाय सल्लागार म्हणून काम करण्याची इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.यासोबतच या कार्यक्रमामध्ये नवनियुक्त अधिकाऱ्यांचे सत्कार देखील करण्यात आले