जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी विधानभवनावर शासकीय कर्मचाऱ्यांचे पायी ‘पेन्शन मार्च’ आंदोलन कल्याण पासून पायी चालत हजारो कर्मचाऱ्यांची मुंबई,विधानभवनावर धडकणार

प्रमुख मागणी – 2005 नंतरच्या कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन लागू करा.

राज्यातील असंख्य शासकीय कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी ‘पेन्शनमार्च’ आंदोलन करत दि. 21 डिसेंबर 2021 पासून कल्याणच्या ग्राम- पडघा येथून पायी चालत मुंबईतील विधानभवनावर धडक देत आहेत. या पेन्शन मार्च आंदोलनाची सुरुवात उद्या कल्याण मधिल ग्राम – पडघा येथून होणार आहे.
महाराष्ट्र शासनाने दि. 1 नोव्हेबर 2005 रोजी व नंतर नियुक्त सर्व कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन बंद करून तिला पर्याय म्हणून राज्य सरकारची DCPS/NPS योजना सुरु केली आहे. या नवीन पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातील रक्कम बाजारात विविध कंपन्यामध्ये गुंतवून त्यातून कर्मचाऱ्याना पेन्शन देण्याचे धोरण आहे, मात्र मागील १६ वर्षातील या DCPS/NPS योजनेचे स्वरूप बघता हि योजना फसवी असून त्यातून कर्मचाऱ्याना जुनी पेन्शन प्रमाणे निवृत्तीवेतन मिळताना दिसत नाही. ज्यामुळे मागील 16 वर्षात मयत किंवा सेवानिवृत्त झालेले असंख्य कर्मचारी व त्यांचे परिवार कोणत्याही पेन्शन पासून वंचित असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाच्या सेवेसाठी आपले पूर्ण आयुष्य अर्पण करणाऱ्या कर्मचाऱ्यावर अशी वेळ येणे निंदनीय आहे. त्यामुळे दि. 1 नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचे लाभ पूर्ववत लागू करावे अशी मागणी महाराष्ट्रातील सर्व संघटना मागील पंधरा वर्षापासून विविध आंदोलने करून करत आहेत मात्र शासनाने आश्वासने देऊन वेळोवेळी कर्मचाऱ्यांची फक्त फसणूकच केली आहे. त्यामुळे शासनाविषयी कर्मचाऱ्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
शासनाचे या अन्यायी धोरणाविरुद्ध आता महाराष्ट्रतील सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी – कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक, तलाठी, ग्रामसेवक, लिपिकवर्गीय, चतुर्थश्रेणी तथा अन्य संवर्गीय पदाच्या कर्मचारी संघटना एकत्र येऊन ‘जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या’ माध्यमातून दि. 22 नोव्हेंबर 2021 ( आझाद मैदान, मुंबई) ते दि. 8 डिसेंबर 2021 ( सेवाग्राम, वर्धा) पर्यंत महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यातून ‘पेन्शन संघर्ष यात्रा’ काढण्यात आली. या पेन्शन संघर्ष यात्रेत मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यानी सहभाग घेऊन जुन्या पेन्शनची मागणी केली व शासनाविषयी आपला असंतोष व्यक्त केला. मात्र शासनाने या बाबीच गांभीर्य लक्षात न घेता जुन्या पेन्शनच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
त्यामुळे शासनाचे जुन्या पेन्शनच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी उद्या दि. २१ डिसेंबर २०२१ पासून राज्यातील असंख्य कर्मचारी कल्याण मधिल साई मंदिर, खडोली फाटा येथे एकत्र येऊन पायी चालत ‘पेन्शनमार्च’ आंदोलन करून विधानभवन, मुंबईवर धडक देत आहेत. शासन जो पर्यंत मागण्या पूर्ण करीत नाही तो पर्यंत विधानभवनासमोरच तीव्र आंदोलन करण्याचा व पुढे तिथूनच राज्यातील सर्व विभागातील कर्मचारी संपावर जाऊन राज्याचा कारभार बंद पाडण्याचा निर्धार कर्मचाऱ्यानी केला आहे.
• प्रमुख मागण्या :-
1) शासनाच्या सेवेत दि. ०१ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्याना जुन्या पेन्शन योजनेचे सर्व लाभ पूर्ववत लागू करावे.
2) दि. ०१ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त झालेल्या मृत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्याना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू नि सेवा उपदानाचे लाभ तात्काळ देण्यात यावे.
संयोजक
श्री. वितेश राजेंद्र खांडेकर जुनी पेन्शन संघर्ष समन्वय

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here