आज (दि.26) रोजी इंदापूर पोलीस ठाणे अंतर्गत सरडेवाडी टोल नाक्या जवळ शासकीय गोडाऊन मधून 500 पोती गहू चोरून सोलापुर- पुणे महामार्गाच्याने पुण्याच्या दिशेने जात असलेल्या ट्रक वर इंदापूर पोलिसांनी कारवाई केली आहे.
सविस्तर असे की, सोलापूर-पुणे महामार्गाने पुणे दिशेकडे जात असलेला संशयित ट्रक क्र. MH- 13 AX- 4709 हा चालला असता इंदापूर पोलिसांनी या ट्रक ची दोन पंचांसमक्ष तपासणी केली. सदर ट्रकच्या चालकाने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली व त्याच्या ताब्यातील ट्रक मधील मालाची तपासणी केली. त्यामध्ये एकूण 500 गव्हाची पोती मिळून आली.
याबाबत चालकाकडे विचारपूस केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.परंतु सदरचा गहू कोणत्यातरी शासकीय गोडाऊन मधून चोरून अवैधरित्या जीवनावश्यक वस्तूचा साठा करून काळया बाजारामध्ये हा गहू विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असल्याची खात्री इंदापूर पोलिसांना झाली.
याबाबत सविस्तर पंचनामा करून सदरचा दहा चाकी ट्रक त्यामधील 500 पोती गहू एकूण 25 टन असा 15 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला.
यातील ट्रक चालका विरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम 3, 7 तसेच भारतीय दंड संहिता अधिनियम कलम 379, 420 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तयुब मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस करत आहेत.