ज्येष्ठ लेखक आणि संपादक गिरीश कुबेर यांच्यावर आज नाशिक येथील साहित्य संमेलनामध्ये संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक करुन हल्ला करण्यात आला आहे. त्यांनी लिहलेलं ‘Renaissance State’ या पुस्तकावर सध्या महाराष्ट्रात बराच वाद सुरु आहे.या पुस्तकात कुबेर यांनी आक्षेपार्ह लिखाण केल्याचा ठपका अनेकांनी ठेवला आहे. अनेक राजकीय पक्ष, विविध संघटना, गट आणि लोकांकडून पुस्तकारावर बंदी आणण्याची देखील मागणी केली होती. त्यांच्यावर झालेल्या या शाईफेकीच्या घटनेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मत मांडलंय. त्यांनी म्हटलंय की, आपल्याकडे लोकशाही असून लोकशाहीत मत व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. विरोध करण्याचाही अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र व्यक्तिगत हल्ला करणे चुकीचा आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी या घटनेचा निषेध केलेला आहे.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार यांनी या घटनेचा निषेध करताना म्हटलंय की, हा वाद गेल्या पाच-सहा महिन्यांपासून सुरु होती. कुबेरांचं हे पुस्तक मी स्वत: वाचलेलं आहे. कुबेरांना लोकशाहीमध्ये स्वत:ची मते मांडण्याचा अधिकार आहे. या मतांचा विरोध करणारे दुसरे घटकही असू शकतात. या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण स्विकारलेलं आहे. आणि ते स्वातंत्र्य असल्यामुळे एखादी गोष्ट एखाद्या लेखकानं लिहली तर त्याबद्दल व्यक्तिगत हल्ला करणं ही गोष्ट अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधी असून चुकीची आहे. आम्ही कुणीही कधीही त्याचा पुरस्कार करणार नाही. ही घटना निंदनीय नाही. ही घटना घडणे महाराष्ट्राला शोभत नाही. आणि विशेषत: ज्या परिसरामध्ये हा सोहळा इतक्या उत्साहाने सुरु आहे, अशा परिसरामध्ये अशी घटना घडणे अत्यंत चुकीचं आहे, असं त्यांनी म्हटलंय.
तुम्ही पुस्तक वाचलेलं आहात, तुम्हाला त्यात काही आक्षेपार्ह आढळलं का? या प्रश्नावर शरद पवार यांनी म्हटलंय की, त्यांची काही मते आहेत, मी काही इतिहासाचा तज्ज्ञ नाही. मी जास्त खोलात गेलो नाही. त्यांची मते मान्य नसतील तर तुम्हीही लिहू शकता. मते मांडू शकता, मात्र हल्ला करु शकत नाही.