चुरशीच्या लढतीत सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिक यांनी मारली बाजी .

चुरशीच्या लढतीत सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिक यांनी बाजी मारली.या आखाड्यात त्यांनी आपले प्रतिस्पर्धी शिवसेनेचे संजय पवार यांना चितपट करून अस्मान दाखविले. शिवसेनेचे सुहास कांदे यांचे मत निवडणूक आयोगाने बाद ठरविल्याने शिवसेनेला धक्‍का बसला आहे.
अपेक्षेप्रमाणे भाजपचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, माजी मंत्री अनिल बोंडे, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे संजय राऊत व काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी हे निवडून आले. तब्बल 8 तासांच्या प्रदीर्घ नाट्यानंतर रात्री पावणेदोन वाजता मतमोजणी सुरू झाली.
जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांनी आपली मतपत्रिका अधिकृत प्रतिनिधीशिवाय इतरांना दाखविल्याचा आक्षेप भाजपने घेतला. राज्य निवडणूक आयोगाने हा आक्षेप फेटाळल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागून राज्यसभेची निवडणूकच रद्द करण्याची मागणी केली होती. तर महाविकास आघाडीने रवी राणा आणि सुधीर मुनगंटीवार यांनीही निवडणूक नियमांचा भंग केल्यामुळे त्यांचे मत अवैध ठरविण्यात यावे, अशी मागणी केली.
भाजप आणि महाविकास आघाडी यांच्या या परस्परविरोधी तक्रारीनंतर वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज मागून घेतले व त्याची पाहणी केली.
अखेर साडेआठ तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने आपला निर्णय राज्य निवडणूक आयोगाला कळविला. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ही प्रत निवडणूक यंत्रणेला दिली. त्यावेळी शिवसेनेचे सुहास कांदे यांचे मत अवैध ठरविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली.
सुहास कांदे हे संजय राऊत यांच्या कोट्यात असल्याने धक्‍का कोणाला बसणार याची चर्चा चालू झाली. मात्र महाविकास आघाडीचे नेते एकत्रितपणे ‘आमची चारही उमेदवार निवडून येणार’ यावर ठाम होते.
रात्री बारापर्यंत वाट पाहून विधान भवनातून परतलेले सर्व नेते रात्री दीडच्या सुमारास पुन्हा विधान भवनात दाखल झाले. त्यानंतर पावणेदोन वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या एक तासात कोणताही निकाल बाहेर आला नाही.
निवडणुकीत पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेस इम्रान प्रतापगढी, शिवसेनेचे संजय राऊत, भाजपचे पीयूष गोयल व अनिल बोंडे हे पाचजण पहिल्या फेरीतच विजयी झाले.
खरी चुरस होती ती सहाव्या जागेसाठी. तेथे कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यातील शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात चुरशीची लढत होती. या लढतीवर अनेक पैजाही लागल्या होत्या. अखेर मतमोजणीच्या दुसर्‍या फेरीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी बाजी मारली व ते अजिंक्य ठरले.
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे ः पीयूष गोयल (48), अनिल बोंडे (48), प्रफुल्‍ल पटेल (43), इम्रान प्रतापगढी (44), संजय राऊत (42), धनंजय महाडिक (41). पहिल्या फेरीत संजय पवार यांना 33 तर धनंजय महाडिक यांना 27 मते मिळाली होती.
धनंजय महाडिक दुसर्‍या फेरीत विजयी झाले. त्यांना 41 मते, तर शिवसेनेच्या संजय पवार यांना 33 मते मिळाली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here