चंद्रप्रभू स्कूलमधून भविष्यात देशाला शास्त्रज्ञ मिळतील – चेअरमन नरेंद्र गांधी

नातेपुते: चंद्रप्रभू एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मेडीयम स्कूल नातेपुते येथे गुरुवार,दि-२ मार्च २०२३ रोजी सर्व विषयावरील ‘नॉलेज एक्स्पो २०२३’ हे भव्य दिव्य प्रदर्शन संपन्न झाले. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध विज्ञान विषय शिक्षक श्री. एच. के. कुलकर्णी सर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी बोलतांना कुलकर्णी सरांनी, ‘चंद्रप्रभू स्कूलने या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे काम केले.’ असे मत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. नरेंद्र गांधी, व्हॉईस चेअरमन डॉ. वर्धमान दोशी, सेक्रेटरी श्री. विरेंद्र दावडा, खजिनदार श्री. संजय गांधी,संचालक श्री. बाहुबली चंकेश्वरा व श्री.विरेंद्र डूडू , दाते प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. बडवे सर त्यासह सौ. गौरी ज्ञानराज पाटील, सौ. सुप्रिया अतुल पाटील, सौ. अर्चना गांधी, सौ. वर्षा दावडा, सौ. नीलिमा दोशी, सौ.चांकेश्र्वरा मॅम , मुख्यध्यापिका शितल ढोपे मॅडम आदी उपस्थित होते.
या प्रदर्शनामध्ये नर्सरी ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सर्व विषयांचे प्रदर्शन असल्यामुळे प्रदर्शनास भव्यता आली होती. वेगवेगळ्या दहा हॉल मध्ये विविध विषयावार उपकरणांची मांडणी केली होती.
सुरुवातीला विज्ञान विषयावरील उपकरणांची मांडणी केली होती. यामध्ये विद्यार्थ्यानी सोलर सिस्टीम, विंड मील, रॉकेट, रोबोट, मानवी शरीर रचना, कॉम्पुटर, हृदयाचे स्पंदन यासारखे विविध उपकरण विद्यार्थ्यानी तयार केले होते. यांची सुंदर मांडणी करून यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यानी पाहुण्यासह इतरांना उपकरणांची माहिती देवून प्रात्यक्षिक दाखवत होते. रॉकेट आणि उपग्रह (Satellite) यावेळी सर्वांचे खास आकर्षण ठरले.
दैनंदिन जीवन आधिक सुदंर करणाऱ्या कार्यानुभव (क्राफ्ट) या विषयाच्या प्रदर्शनात पूर्व प्राथमिक विभागातील चिमुकल्यांनी सुद्धा प्राथमिक विभागाच्या बरोबरीने सहभाग घेवून विविध दैनंदिन वस्तू बनवल्या होत्या. यामध्ये संगणक,घरे, फ्लॉवर पॉट, झाडे, कापडी पिशव्या, झुंबर, दोऱ्यापासून गणपती सह शेकडो वस्तू पाहणाऱ्यास आकर्षित करत होत्या.
त्यानंतर गणित विषयातील विविध आकडेमोड करणाऱ्या उपकरणांची मांडणी करण्यात आली होती. त्याचबरोबर कोन, त्रिकोण, चौरस,किलोमीटर सह अनेक गणितीय संकल्पना सहजरित्या समजतील अशी उपकरणे मुलांनी बनवली होती.
त्यापुढील दालना मध्ये इंग्रजी या विषयाच्या अनुषंगाने उपकरणांची सुबक आणि रंगीबेरंगी तक्यासह मांडणी केली होती. यामध्ये इंग्रजी शब्द संपत्ती वाढवणारी उपकरणे, आकर्षित तक्ते मांडले होते. यावेळी याचे स्पष्टीकरण विद्यार्थी अत्यंत प्रभावीपणे इंग्रजी भाषेतून देत होते.
ऐतिहासिक आणि भौगोलिक उपकरणांचे तर सर्वांनाच खास आकर्षण असते. इतिहास आणि भूगोल याविषयी उपकरणांचे सुद्धा भव्य दालन केले होते. या दालना मध्ये रायगड , राजगड, लालकिल्ला, कुतुबमिनार, गेट वे ऑफ इंडिया यांचे हुबेहूब प्रतिकृती थरमाकोल, पूठ्ठा यांचा वापरकरून साकारली होती. तसेच वाघनखे, कट्यार, तलवार, मानवी उत्क्रांती , सूर्य मंडळ, धबधबा, सोलर सिस्टीम, पाण्याची घनता आणि क्षारता दाखवणारे प्रात्यक्षिक सह असंख्य उपकरण विद्यार्थ्यानी सुरेख बनवली होती.
महाराष्ट्राला मोठ्या ऐतिहासिक सांस्कृतिक वारशाची परंपरा आहे. वारी ही त्यातीलच एक परंपरा! अशी ही पंढरीची वारी म्हणजेच पालखी सोहळा अतिशय सुंदर पद्धतीने साकारला होता. त्यात हरिनामाचा गजर सुद्धा यांत्रिक पद्धतीने चालू होता.
त्यानंतर राष्ट्रीय भाषा असणाऱ्या हिंदी, मराठी आणि संस्कृत या भाषा विषयांचे रसरंग कला दालन निर्माण केले होते. यामध्ये खास आकर्षण होते ‘चंद्रावरची शाळा’ हे प्रात्यक्षिक. त्याचं बरोबर समनार्थी, विरुधर्थी शब्द, शब्द कोडी, कविता, निबंधसह विविध भाषा सौंदर्य वाढवणारे विविध उपकरने साकारली होती.त्याचबरोबर संगणकावर सामान्य ज्ञानावर आधारित एक प्रश्नावली तयार केली होती. अनेक मुले,पालक व पाहुण्यांनी सदर प्रश्नावली सोडवली.
यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. नरेंद्र गांधी यांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रात्यक्षिकास भेट देवून त्याची कार्यशैली समजून घेवून विद्यार्थ्यानचे कौतुक करताना ” विद्यार्थ्यामधून भविष्यातील शास्त्रज्ञ तयार होतील अशी अपेक्षा मांडली. पुढे बोलताना त्यांनी सर्व विषयावरील आगळेवेगळे सुबक सुंदर प्रदर्शन करून चंद्रप्रभू स्कूल ने संशोधनात सुद्धा आदर्श निर्माण केल्याची भावना व्यक्त केली. सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशील दृष्टिकोनामुळे भव्यदिव्य प्रदर्शन यशस्वीपणे पार पडले असून याचे सर्वश्रेय संस्थेचे चेअरमन श्री. नरेंद्र गांधी यांनी सर्व शिक्षक स्टाफला दिले आहे.
अशा प्रकारे सर्व विषयांची मिळून पाचशे उपकरणे विद्यार्थ्यानी बनवलेली होती. आणि विशेष म्हणजे सर्व विद्यार्थी आपल्या उपकरणांची प्रभावी पणे माहिती देवून प्रात्यक्षिक दाखवत होते. यावेळी सर्व उपकरणांची मांडणी अतिशय सुंदर व आकर्षक पद्धतीने केली होती. दहा दलनामध्ये उपकरणांची मांडणी केली होती. यावेळी पालकांसह पंचक्रोशीतील डॉक्टर, शिक्षकवर्ग, बिझनेसमन, बाह्यशालेय विद्यार्थी, तरुण आणि मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता. यावेळी एक हजार लोकांनी प्रदर्शनास उपस्थिती दाखवली होती. यावेळी पालक वर्गातून मुलांच्या कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टिकोनाचे कौतुक होत होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here