👉 अवघ्या 72 तासात आरोपींना बेड्या ठोकल्या हे पोलिसांचे कार्य कौतुकास्पदच- आ.दत्तात्रय भरणे
👉 पीडित कुटुंबाला लागेल ती मदत करणार- आमदार भरणे
इंदापूर- इंदापूर तालुक्यात खोरोची या गावी शुक्रवार दिनांक 16 डिसेंबर २०२२ रोजी भयानक दरोडा टाकत आरोपींनी दरोड्यामध्ये केलेल्या मारहाणीत दयाराम नारायण कणीचे (वय -70) यांचा जबर जखमी होऊन मृत्यू झाला. या दुर्दैवी कणीचे कुटुंबियांची आज माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट घेऊन सांत्वन केले.या दरोड्यातील मारहाणीच्या घटनेमध्ये जनाबाई नारायण कणीचे (वय -60) या जबर जखमी असून त्यांचीही यावेळी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी चौकशी केली. यावेळी भरणे मामा म्हणाले की “सदरची घटना ही अतिशय दुर्दैवी आहे,या वृद्धांवर फार मोठा अन्याय झाला आहे हा अन्याय माणुसकीला शोभेल असा नाही.”
यावेळी दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर पोलीस स्टेशनच्या कर्तबगार कर्मचाऱ्यांचे आरोपी त्वरित पकडण्याबाबत आभार मानले व या प्रकरणाची सखोल चौकशी करून जे जे लोक यात सामील आहेत त्यांना कठोर शासन झाले पाहिजे असे मत व्यक्त केले.
यावेळी बावडा विभागाचे पोलीस अधिकारी नागनाथ पाटील यांचे व इंदापूर पोलीस स्टेशन तसेच त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांनी अवघ्या 72 तासांमध्ये या खुनाचा तपास लावला व आरोपींना बेड्या ठोकल्या हे कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गारही भरणे यांनी काढले.येणाऱ्या काळात किणीचे कुटुंबाला लागेल ती मदत द्यायला मी तयार आहे अशी ही भूमिका माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केली.