कोरेगाव-भीमा दंगल,चौकशी आयोग…धक्कादायक माहिती …..ॲड.राहुल मखरे यांच्या फेसबुक पोस्टवरचे तपास यंत्रणेबाबतचे ५ महत्वपूर्ण मुद्दे चर्चेत. वाचा सविस्तर.

भीमा कोरेगावमध्ये 1 जानेवारी 2018 ला हिंसा उसळली होती. या घटनेला या येणाऱ्या 1 जानेवारीला 5 वर्षं पूर्ण होतील. त्या घटनेचे पडसाद नंतर महाराष्ट्राच्या राजकारणावरही पडले होते. या प्रकरणातील तपास यंत्रणेमार्फत केलेल्या कामगिरी विषयी एडवोकेट राहुल मखरे यांनी धक्कादायक माहिती आपल्या फेसबुकच्या लिखाणामार्फत मार्फत समोर आणली आहे.त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर काही धक्कादायक माहिती दिली आहे ती खालील प्रमाणे :
कोरेगाव – भीमा दंगल , चौकशी आयोग…धक्कादायक माहिती.
१ ) दिनांक १९/१२/२०२२ रोजी च्या कामकाजात साक्षीदार व दौंड परिक्षेत्राचे तत्कालीन Dy.S.P. गणेश मोरे यांचा उलट तपास घेतला.
त्यात सांगितले की ,
पुणे शहर पोलिस एल्गार परिषदेच्या संदर्भातील गुन्ह्याचा तपास करत असताना त्यांनी कोरेगाव – भीमा दंगलीच्या बाबतीत स्थानिक पोलिसांच्या बरोबर कोणत्याही प्रकारे औपचारिक चर्चा केली नाही. त्याच बरोबर कोरेगाव – भीमा दंगलीचा व एल्गार परिषदेचा काहीएक संबंध नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
२ ) ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हा घडला त्या शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी प्रत्येक आठवड्याला साप्ताहिक रिपोर्ट Dy. S.P. गणेश मोरे यांना कळवणे बंधनकारक असताना त्यांनी १७ डिसेंबर २०१७ पासून पुढे ४ जून २०१८ पर्यंत साप्ताहिक रिपोर्ट Dy. S.P. मोरे यांना दिला नाही.
१ जानेवारी २०२२ च्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर व दंगली नंतर तापसतील प्रगतीचा व अन्य गुन्ह्यांच्या तपासाचा हा रिपोर्ट असतो. तो जर दिला नाही तर त्यांच्या विरोधात Dy.S.P. मोरे हे S.P. सुवेझ हक यांना गलांडे यांचे बद्दल तक्रार करू शकत होते पण त्यांनी तसे केले नाही. उलट पोलीस निरीक्षक गलांडे यांना वाचवण्यासाठी त्यांनी उलट तपासात शपथेवर खोटी उत्तरे दिली आहेत.( पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांचे दंगली नंतर फडणवीस यांच्या गृहमंत्रालयाने प्रमोशन केले व ते पुढे ACP झाले.)
३ ) १ जानेवारी २०१८ च्या दंगली नंतर वढू बुद्रुक येथील व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये एक व्यक्ती म्हणतो ,”आपल्याकडून चुकी होऊ द्यायची नाही… त्यांनी काय केले तर सोडायचे नाही…आपण सुरुवात करायची नाही… शेवट करायचा कधीपण… “
दुसरा व्यक्ती म्हणतो ,” सगळे काय करायचे… पोलीस आहेत… “हा व्हिडीओ चौकशी आयोगासमोर दाखवण्यात आला. त्याबद्दल सरकारचे असे म्हणणे होते की या व्हिडिओ बरोबर छेडछाड करून आयोगासमोर दाखल करण्यात आला आहे.
सरकारच्या वतीने हा व्हिडीओ फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आला होता व त्यामध्ये छेडछाड नाही असा अहवाल फॉरेन्सिक लॅबने दिला आहे.याचा अर्थ हा व्हिडीओ अत्यंत महत्वाचा असून दंगलीच्या प्लानिंगचा दुसरा भाग येथे दिसून येत आहे.
४ ) यातील सर्वात धक्कादायक व पुराव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब म्हणजे SBI बँकेच्या CCTV फुटेज बद्दल आहे.या CCTV फुटेज वरून असे दिसत आहे की काही व्यक्ती बँकेच्या शेजारी पिशवी सदृश्य वस्तू ठेवत आहेत व ती वस्तू काही वेळाने आपोआप पेट घेत आहे. ( इथे दंगलखोरांनी ज्वालाग्राही पदार्थ वापरला आहे हे सकृतदर्शनी दिसून येत आहे. )बँकेने बसवलेले CCTV कॅमेऱ्याचे व्हिडीओ इतके ब्लर/अंधुक होते की,कॅमेऱ्या समोरीच्या ५ – १० फुटावरील व्यक्तीचा चेहरा सुद्धा ओळखणे शक्य नाही.दंगलखोर आरोपींना वाचवण्यासाठी या व्हिडीओ बरोबर छेडछाड झाली आहे असे आम्ही आयोगाला सांगितले.त्यावरून हा व्हिडीओ सुद्धा फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आला होता व त्याचाही रिपोर्ट आज आयोगासमोर आला.त्यामध्ये असे सांगण्यात आले की हा व्हिडिओ ओरिजनल नाही.विशेष म्हणजे हा व्हिडिओ आयोगाने आम्हा वकिलांच्या मागणीवरून पोलिसांना दाखल करण्यास सांगितला होता व पोलिसांनीच हा व्हिडीओ आयोगासमोर दाखल केला होता.
५ ) आणखी धक्कादायक बाब म्हणजे ४ जानेवारी २०१८ ला SBI बँकेच्या कोरेगाव – भीमा येथील शाखेने शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार दिली होती.त्यामध्ये त्यांनी आमची FIR नोंदवून घ्यावी व बँकेला संरक्षण द्यावे अशी मागणी केली होती.
FIR नोंदवून घेतली गेली असती तर पोलिसांना घटनास्थळाचा पंचनामा करून पुराव्यासाठी आवश्यक गोष्टी ताब्यात घ्याव्या लागल्या असत्या.त्यामध्ये CCTV कॅमेऱ्याने चित्रित केलेला व dav मध्ये स्टोअर केलेला ओरिजनल व्हिडीओ त्यांच्या ताब्यात घ्यावा लागला असता व दंगळखोरांना पकडणे सहज शक्य झाले असते.ज्याअर्थी पोलिसांनी आयोगासमोर दाखल केलेला हा व्हिडीओ ओरिजनल नाही त्याअर्थी पोलिसांनी म्हणजेच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी ओरिजिनल व्हिडीओ ताब्यात घेतला नाही. (याचा स्पष्ट अर्थ काय आहे ते आपणास समजले असेल.)आजच्या क्रॉस घेतानाच्या या ठळक घडामोडी होत्या. कोणत्याही वर्तमानपत्रात या छापून येणार नाहीत.महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील लोकांना या गोष्टी समजाव्यात व पडद्याआड काय घडामोडी घडल्या असाव्यात याची कल्पना यावी म्हणून आज बऱ्याच दिवसांनी मला या विषयावर लिहावे वाटले.( खरा प्लॅन अजून समोर येणे बाकी आहे. ) R.S.S. व भाजपच्या सरकारने बऱ्याच संविधान विरोधी गोष्टी केल्या आहेत. निरपराध लोकांना जेल मध्ये टाकून त्यांचे आयुष्य उध्वस्त केले आहे.सध्या त्यांच्याकडे अनियंत्रित सत्ता आहे व त्याचा ते दुरुपयोग करत आहेत. बघू अजून काय काय करतात ते…कोरेगाव – भीमा येथील स्थानिक मराठा तरुणांच्या बद्दल आमच्या मनात कोणत्याही प्रकारचा आकस नाही. त्यांचा वापर शिवद्रोही भाजपच्या फायद्यासाठी भिडे व एकबोटे यांनी करून घेतला आहे.याची जाणीव स्थानिक मराठा तरुणांना कोशारी , सुधांशू त्रिवेदी यांच्या वक्तव्यावरून झाली असावी असे मला वाटते. त्या लोकांना खऱ्या शत्रू व मित्र यांची ओळख होईल व ते लवकरच सकारात्मक स्टँड घेतील अशी अपेक्षा आहे.नेहमीच सोशल मीडियापासून दूर असणाऱ्या ॲड. राहुल मखरे यांनी स्वतः ही विस्तृत स्वरूपाची फेसबुक पोस्ट लिहून तपास यंत्रणेवर ताशोरे ओढून जी माहिती समोर आणली आहे ती धक्कादायकच आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here