इंदापूर (१ ऑक्टोबर) :- इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नं. १ येथे काल (३० सप्टेंबर) भरदिवसा दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक शेखर अशोक पाटील यांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली असून, ३०७ कलमान्वये आपल्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शेखर पाटील यांनीही भानुदास पंढरीनाथ सातपुते आणि अन्य तिघांनी आपल्याला लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण केेल्याची व अंगावरील सोने व रोख रक्कम लुबाडल्याची क्रॉस तक्रार दिल्याने शेखर पाटील यांनी केेलेला गोळीबार जीवे मारण्यासाठी होता का स्वसंरक्षणासाठी होता याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. शेखर पाटील यांनी जीवे मारण्याची धमकी देत आपल्यावर बंदुकीमधून गोळी झाडल्याची फिर्याद आधी भानुदास पंढरीनाथ सातपुते यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दिली होती. पोलीसांवर दोन्ही बाजूंनी राजकीय दबाव असल्याची चर्चा असल्याने या घटनेची निष्पक्ष चौकशी होणार का? असा सवाल नागरिकांमध्ये आहे.
भानुदास पंढरीनाथ सातपुते (रा. सातपुतेवस्ती, ता. इंदापूर) यांनी इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक असलेल्या शेखर पाटील (रा. सोनाईनगर, इंदापूर) यांच्या विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीमध्ये, आपण व गणेश मेघशाम पाटील आपापसात जमिनीची वाटणी करत असताना शेखर पाटील यांनी ही जमीन माझी असल्याचे सांगत आम्हाला शिवीगाळ, दमदाटी केली व प्रतिकार केला असता आपल्याला जीवे जीवे मारण्याची धमकी देत आपल्या दिशेने बंदुकीतून गोळीबार केल्याचे व गोळी आपल्या कानाजवळून गेल्याने आपण थोडक्यात बचावल्याचे म्हटले आहे. तर शेखर पाटील यांनी, भानुदास पंढरीनाथ सातपुते, श्रीनिवास भानुदास सातपुते, सचिन भानुदास सातपुते आणि रणजित शंकर सातपुते या चार जणांविरोधात दिलेल्या क्रॉस तक्रारीमध्ये, गलांडवाडी नं. १ येथील श्री. स्वामी समर्थ इंटर लॉकिंग सिमेंट विट या आपल्या दुकानातील पेव्हर ब्लॉक आरोपींनी फेकून दिल्याचे व जाब विचारला असता ही जमीन आमची असल्याचे सांगत आपल्याला लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे, आपल्या गळ्यातील ८ तोळ्याची चैन व शर्टच्या खिशातील १० हजार रोख रक्कम लुबाडल्याचे म्हटले आहे.
जमिनीच्या वादातून घडलेली ही गोळीबाराची घटना काल शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने पोलीस ठाण्याच्या आवारात अनेकांनी गर्दी केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी इंगळे हे देखील इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. एकमेकांविरोधातील क्रॉस तक्रारीनंतर काल रात्री ८ वाजण्याच्या सुमारास इंदापूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने करत आहेत.