कांद्याने रडवले: भंगार ४० रु किलो,रद्दी २० रु किलो,मात्र कष्टाने पिकवलेला शेतकऱ्यांचा कांदा मात्र ० पैसे किलो. कृषीप्रधान देशात 512 किलो कांदा विकून मिळाले फक्त 2 रुपये.

(उपसंपादक: संतोष तावरे यांचा स्पेशल रिपोर्ट) जगभरात कांद्याची टंचाई मात्र महाराष्ट्रात कांदा रस्त्यावर फेकण्याची शेतकऱ्यांवर वेळ असे का?खरंच या कृषीप्रधान देशात नक्की काय चालू आहे हेच समजत नाही, कारण भंगार ४० रुपये किलो दराने व रद्दी २० रुपये किलो दराने विकली जाते, परंतु शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा मात्र “०” पैसे दराने विकला जातो या कृषीप्रधान देशात राज्यकर्त्यांना लाज कशी वाटत नसावी असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमध्ये उमटू लागला आहे. जगभरात कांद्याची भयानक टंचाई जाणवत असून पाकिस्तान इंडोनेशिया या देशात तर 200 च्या वरती भाव कांद्याला गेला आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये कांद्याला रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. असे का? असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडत आहे. राज्यकर्त्यांचे ढिसाळ नियोजन ,शेतकरी विरोधी कायदे, कांद्याची निर्यात बंदी ,असे कित्येक कारणे असून यामुळेच शेतकऱ्यांची पुरेपूर वाट लागली आहे. शेतकरी आत्महत्या वाढत चालले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील राजेंद्र चव्हाण या शेतकऱ्याने सोलापूर मार्केट यार्ड मध्ये १७ फेब्रुवारी रोजी दहा पोत्यातून ५१२ किलो कांदा विकला होता. कांद्याचे दर घसरल्याने त्या शेतकऱ्याला प्रति किलो १ रुपया प्रमाणे भाव मिळाला. मोटर भाडे ,तोलाई ,हमाली चे पैसे वजा करून त्या शेतकऱ्याला दहा पोत्यातून फक्त दोनच रुपये शिल्लक राहिले होते आणि त्या शेतकऱ्याला फक्त दोनच रुपयाचा चेक देण्यात आला आणि तोही ८ मार्चचा त्यामुळे सगळीकडेच शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. कांद्याचे दर वाढल्यावर सर्वसामान्यांचे बजेट कोलमडते अशी ओरड केली जाते. डोळ्यात पाणी आल्याचे चित्र रंगवले जाते. परंतु काही दिवसापासून कांद्याची शेती करणाऱ्या बळीराजावर संक्रात आल्याचे चित्र राज्यभरातून दिसत आहे. ज्यावेळी राज्यकर्ते रात्री साखर झोपे मध्ये असतात, त्यावेळी माझा शेतकरी राजा मात्र विंचू काट्याची न परवा करता रात्री अपरात्री शेतामध्ये पाणी देताना दिसतो, राबताना दिसतो, एवढे कष्ट करून सुद्धा त्याला माहीत नसते, कोणत्या पिकाला किती भाव मिळेल किती पैसा मिळेल, का नुकसान होईल, तरी तो कष्ट करत राहतोच. परंतु हेच राज्यकर्त्यांना दिसून येत नाही. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय प्रशासन कोणतेच घेत नाही. त्यामुळे शेतकरी राजा हा पूर्णपणे डुबला जातोय .कांद्यानी सर्व शेतकऱ्यांना रडवले आहे. आणखीनही एका दुसऱ्या शेतकऱ्यावर अशीच वेळ आली आहे .बंडू भांगे या शेतकऱ्याचे नाव असून या शेतकऱ्याने ८२५ किलो कांदा विकून हाती काही सुद्धा आले नाही. हमाली, तोलाई, गाडी भाडे वजा करून शून्य रुपये त्या शेतकऱ्याच्या हाती आले. उलट त्या शेतकऱ्याला एक रुपया त्या व्यापाऱ्याला देण्याची वेळ आली आणि रिकाम्या हातीच घरी माघारी परतावे लागले.अशी दयनीय परिस्थिती शेतकऱ्यांची झाली असून कांद्याबरोबरच सर्व पिकांना असाच शेतकऱ्यांना सतत फटका बसत चाललेला पहावयास मिळत आहे .जनता एक्सप्रेस मराठी न्यूजशी बोलताना शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पांडुरंग रायते म्हणाले की, जगभरात कांद्याला मोठ्या प्रमाणावर मागणी असून सुद्धा केवळ आपल्या कांद्याला निर्यात बंदी आहे त्यामुळे हा शेतकऱ्यांना फटका बसत चाललेला आहे. शेतकरी विरोधी कायदेही रद्द करण्याची गरज आहे .शेतकऱ्यांना मातीत घालण्याचे काम प्रशासन करत आहे .एवढा शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्यांचा पडीचा काळ असताना तुम्ही अपेक्षाही लाईट बिलाची कशी करताय, कर्ज वसुलीची व काळी पट्टीची ही अपेक्षा कशी करताय ,असा संतप्त सवाल रायते यांनी केला. प्रशासन मात्र हर एक गोष्टीत टॅक्स कसा मिळेल याची अपेक्षा करत आहे .आपल्यावर इंग्रजांनी राज्य केले. मोघलांनी राज्य केलं. शिवाजी महाराजांचा कार्यकाल जर सोडला तर पेशव्यांनी सुद्धा राज्य केलं. यांच्यापेक्षाही भयानक राज्य करण्याची पद्धत आता राज्यकर्त्याकडून चालू आहे आत्ता तरी या गोष्टीची लाज, लज्जा,शरम या राज्यकर्त्यांना येणार आहे का नाही असा घनाघात रायते यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूजशी बोलताना प्रशासनावर केला .शेतकऱ्यांनो तुम्ही संघटित होण्याची गरज आहे. आणि संघटित नाहीत झाला तर हे सर्वच राज्यकर्ते तुम्हाला लचके घेतल्याप्रमाणे मृत्यूच्या दारापर्यंत नेल्याशिवाय राहणार नाही. कारण शेतकरी जगेल असा कोणताच निर्णय हे राज्यकर्ते घेऊ शकत नाहीत एक दिवस शेतकरीच थांबला तर हे जग उपाशी राहणार आहे हे सर्वच राजकीय पक्षांना माहित आहे. परंतु शेतकऱ्यांमध्ये एकजूट नाही हे पाहूनच सर्वच जण शेतकऱ्यांची थट्टा करताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनो एकत्र या, संघटित व्हा ,तरच आपण टिकणार आहोत असे मत जनता एक्सप्रेस मराठी न्यूजशी बोलताना शेतकरी संघटनेचे नेते व क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेडचे शिवाजीराव नांदखिले यांनी व्यक्त केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here