इंदापूर : इंदापूर तालुक्यातील महात्मा फुलेनगर (बिजवडी) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने चालु सन 2021-22 च्या गळीत हंगामामध्ये आज मंगळवारी ( दि.15 मार्च ) 10 लाख मे. टन ऊसाचे गाळप पूर्ण करून चालू हंगामातील ऊस गाळपाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, कारखान्याचा चालू गळीत हंगाम हा अंतिम टप्प्यात असून, या हंगामात 12 लाख में. टन ऊस गाळप पूर्ण करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. कारखान्याचे सहवीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प आदी उपपदार्थ निर्मिती करणारे प्रकल्प पुर्ण कार्यक्षमतेने चालु आहेत.
आज कारखान्याने 10 लाख में. टन ऊस गाळपाचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केलेबद्दल संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूक कंत्राटदार, मुकादम, तोडणी मजूर, अधिकारी, कर्मचारी व हितचिंतक यांचे हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन केले. चालु हंगामात सर्व ऊसाचे गाळप पूर्ण झाले शिवाय कारखाना बंद केला जाणार नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी काळजी करू नये. कर्मयोगी कारखाना हा सहकाराचे मंदिर असून, सर्वांच्या सहकार्यामुळे कारखाना प्रगतीपथाकडे वाटचाल करीत आहे, असेही हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी उपाध्यक्ष भरत शहा, हनुमंत जाधव, शांतीलाल शिंदे, रवींद्र सरडे, छगन भोंगळे, प्रदीप पाटील, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, पराग जाधव, विश्वास देवकाते, निवृत्ती गायकवाड, भूषण काळे, प्रवीण देवकर, रतन देवकर, केशव दुर्गे, सतीश व्यवहारे, हिरा पारेकर, वसंत मोहोळकर, शारदा पवार, कांचन कदम, कार्यकारी संचालक देवराव लोकरे उपस्थित होते.