ओ शेठ.. तुम्ही नादच केला थेट…कांद्याने मालामाल केल्यावर शेतकऱ्याने काय केले ? सविस्तर वाचा.

येवला : दराबाबत कांदा हे पीक कीती लहरीपणाचे आहे हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. पण याच पिकामुळे जेव्हा घर उभा राहते तेव्हा काय घडते याचा प्रत्यय येवला तालुक्यातील धनकवाडी येथील शेतकरी बंधूंनी केलेल्या अनोख्या प्रयोगातून दाखवून दिले आहे.
ऊसापाठोपाठ कांदा हे सर्वात मोठे नगदी पीक आहे. उत्पादन वाढीच्या दृष्टीने हा कांदा लागवडीचा प्रयोग करतात. मात्र, दरातील लहरीपणामुळे कुणाचे साधते तर कुणाचे नुकसानही होते. ज्यांचा फायदा झाला आहे ते शेतकरी पुन्हा कसे उत्पादन वाढेल याचा धोरण आखतात. पण धनकवाडी प्रगतिशील शेतकरी साईनाथ भगवंत जाधव व अनिल भगवंत जाधव या दोघे भावंडांनी कांद्यामुळे हक्काचे घर मिळाले याची जाणीव ठेऊन घरावर चक्क 150 किलो कांद्याची प्रतिकृती उभारली आहे. आज जे घर झाले आहे ते केवळ कांदा पिकामुळेच असाच संदेश त्यांना यामधून द्यायचा आहे. घरावरील 150 कांदा आता येणाऱ्या-जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेत आहे. कांद्यासाठी प्रसिध्द असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हा अनोखा प्रयोग केल्यामुळे एक वेगळीच चर्चा रंगलेली आहे.
काय आहे यामगचा हेतू?
येवला तालुक्यातील धनकवाडी येथील प्रगतिशील शेतकरी साईनाथ भगवंत जाधव व अनिल भगवंत जाधव या दोघे भावंडांना मिळून तीस एकर शेती आहे पण येवला तालुका हा नेहमी दुष्काळी तालुका म्हणून राहिला आहे. या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे दहा ते पंधरा एकर शेतामध्ये कांद्याचे पीक घेतले खर्च वजा जाता पंधरा लाख रुपयांचा निव्वळ नफा शिल्लक राहिला या पैशांची करायचे काय तर दोन्ही भावांनी मिळून घर बांधण्याचा निर्णय घेतला. शेतात घर बांधले आणि कांदा हा लासलगाव बाजार समितीत विक्रीला नेला. त्यावेळी लासलगाव बाजार समितीच्या प्रवेशद्वारा समोर बाजार समितीने नुकतेच कांद्याची प्रतिकृती ही उभारली आहे. आपणही कांद्यातून चांगला नफा मिळाला असल्याने आपल्याही बंगल्याच्या छतावर ही कांद्याची प्रतिकृती असावी म्हणून या अनिल आणि साईनाथ जाधव या दोघे भावंडांनी कांद्याची प्रतिकृती उभारण्याचा निर्णय घेतला.
कशी सुचली संकल्पना?
कांदा पिकाच्या उत्पादनावरच जाधव बंधूनी भले मोठे घर हे शेतात बांधलेले आहे. कांदा पीक दराबाबत लहरीचे असले तरी परीश्रम आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी 15 एकरामध्ये कांद्याचे पीक घेतले. एवढेच नाही तर यामाध्यमातून त्यांना 15 लाख रुपये निव्वळ नफा मिळाला होता. दरम्यानच्या काळात त्यांनी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर कांद्याची प्रतिकृती पाहिली होती. येथील बाजारपेठ ही अशिया खंडात कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. त्यामुळे त्यांनी हे वेगळेपण केले तर ज्यामुळे आपले घर उभा राहिले त्या कांद्यासाठी त्यांनी हे अनोखा प्रयोग केला आहे. घरावरच कांद्याची प्रतिकृती उभारली आहे.
150 किलो वजन अन् 18 हजार रुपये खर्च
हौशेला मोल नाही त्याप्रमाणे जाधव शेतकरी बंधूंनी आपली हौस पूर्ण करुन घेतली आहे. यासाठी त्यांना 18 हजार रुपये खर्च आला पण आपले घर जे उभे आहे ते केवळ कांद्यामुळेच याची जाणीव ठेवण्यासाठी त्यांनी हा अट्टाहास केला आहे. या प्रतिकृती असलेल्या कांद्याचे वजन हे 150 किलो आहे. हा कांदा महाकाय असल्याने दूरवरुन जाणाऱ्यांचेही लक्ष वेधून घेत आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here