इंदापूर ता.प्रतिनिधी सचिन शिंदे
इंदापूर — ओबीसींचा राज्य मागास आयोग स्थापन करण्याची गरज होती.त्या आयोगाला ५०० कोटी रुपये निधी देण्याचे ही धाडस महाविकास आघाडी सरकारने दाखवले नाही. राज्यात ७२ टक्के च्या आसपास केवळ ओबीसींचे मतदान असताना आमच्या हक्काचे २७ टक्के आरक्षण जाणीवपूर्वक पळवण्याचे काम राज्यसरकारने केले आहे. त्यासाठी पळवून नेलेले आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी येत्या १ जानेवारी २०२२ रोजी इंदापूरात तीव्र आंदोलन छेडून या आंदोलनाची ठिणगी राज्यभर पेटवणार आहोत अशी घोषणा भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चा इंदापूर तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी केली.
भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चा इंदापूर तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि.२२ डिसेंबर रोजी ओबीसी संघर्ष समितीच्या वतिने इंदापूर शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते.
यावेळी संपत जाधव अध्यक्ष भारतीय स्वातंत्र अमृत मोहत्सव समिती, कर्मयोगीचे माजी संचालक अतुल व्यवहारे,युवराज मस्के भाजपा प्रदेश चिटणीस जि.पं.समिती आघाडी,संतोष कांबळे सचिव भाजपा अनु.जाती मोर्चा, शब्बीर बेपारी,रमेश राऊत, दत्तात्रय सपकळ,आबासाहेब थोरात जिल्हा कार्याध्यक्ष ओबीसी मोर्चा,बामसेफचे संजय शिंदे, पोपट पवार आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले की, १ जानेवारी ला नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी शहरातील संत सावतामाळी मंदीरातून ओबीसींचा भव्य मोर्चा शहरातील मुख्य बाजारपेठेतून निघेल.आम्ही केवळ मोर्चा वरती थांबणार नाही तर त्याच दिवशी इंदापूरात रास्ता रोको करु आणि इंदापूरात कडकडीत बंद देखील पाळू. राज्यसरकारला जाग आनण्यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडून त्याची दाहकता दाखवून देण्याची वेळ आली आहे. या दहा दिवसात वाडीवस्तीवर जाऊन समाजात आम्ही जागृती करणार आहोत.इंदापूरातून पेटलेली ही चिंकारी राज्यभरात मोठा वणवा करेल त्या दृष्टीने आंदोलन छेडले जाईल.येणाऱ्या १ जानेवारीला ओबीसी समाजाची ताकद दाखवून द्या तरच आगामी काळात समाजाला न्याय मिळेल.असे आवाहन त्यांनी ओबीसी समाज बांधवांना केले आहे.
महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षात इंम्पिरीअल डाटा का तयार केला नाही.राज्य सरकार केवळ ओबीसी समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहे.आपल्या हक्काचे हिसकावून घेतलेले हे आरक्षण परत मिळवण्यासाठी आता आपण ओबीसी समाज बांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे. अन्यथा येणारा भविष्यकाळ माफ करणार नाही असे मत नाभीक समाजाचे पुणे जिल्हाध्यक्ष रमेश राऊत यांनी व्यक्त केले.