एसटी चालकाचे टोकाचे पाऊल, तोडगा निघत नसल्याने केली आत्महत्या.दुर्दैवी घटनेने हळहळ.

एसटी कर्मचाऱ्यांचं  महिन्याभरापासून आंदोलन सुरु आहे. पण या आंदोलनावर राज्य सरकारडून कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही.विशेष म्हणजे या आंदोलनावर तोडगा निघाला नाही म्हणून एसटीचं खासगीकरण होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. पण या चर्चेमुळे आणि मागण्या मान्य न झाल्यामुळे नैराश्यात गेलेल्या एका एसटी कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचं गहिनाथ गायकवाड असं नाव आहे. नाशिकच्या पेठ आगारातील गहिनाथ गायकवाड हे एसटी कर्मचाऱ्यांचं सुरु असलेल्या आंदोलनातही सहभागी झाले होते. ते मूळचे बीड येथील रहिवासी आहेत. कमी पगार आणि कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या या टोकाच्या निर्णयामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबात एक वर्षाचा मुलगा आणि पत्नी आहे.
गायकवाड यांच्या सहकाऱ्यांकडून रोष व्यक्त:- गहिनाथ गायकवाड यांच्या आत्महत्येनंतर त्यांचे काही सहकारी आक्रमक झाले. त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. “हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. ते आणखी किती कर्मचाऱ्यांचा बळी घेणार?”, असा सवाल गायकवाड यांच्या सहकाऱ्यांनी केला. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीची दखल न घेणाऱ्या या सरकारचा आपण निषेध करत असल्याचंही ते रोषात म्हणाले.
एसटी महामंडळाचं खासगीकरण होणार का? अनिल परबांकडून स्पष्टीकरण:- दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी महामंडळाच्या खासगीकरणावर सुरु असलेल्या चर्चेवर स्पष्टीकरण दिलं आहे. एसटी महामंडळाचं खासगीकरण करण्याचा विचार नाहीये मात्र, तो एक पर्याय आहे, असं परब म्हणाले. “एसटी महामडंळाचं राज्य शासनात विलिगीकरण करण्यात यावं अशी मागणी करत एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या विलिगीकरणाच्या निर्णयावर समितीच निर्णय घेईल. याशिवाय चर्चा नेमकी कुणाशी करायची? ना एसटी कर्मचारी युनियनचे ऐकतायत ना भाजप नेत्यांचे. आंदोलन नेतृत्वहीन झालंय. कामगारांनी सांगावं कुणाशी बोलावे, त्यांच्याशी बोलायला मी तयार आहे. वेगवेगळ्या राज्यांचा अभ्यास करतोय. तिथली वाहतूक व्यवस्था आणि कर्मचाऱ्यांचे वेतन याचा आढावा घेतला जातोय”, अशी देखील प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here