इंदापूरसारख्या तालुकास्तरीय शहरामध्ये तब्बल 12 वर्षापेक्षा जास्त काळात घाणीच्या साम्राज्यात वावरणारे तापी सोसायटी व विमल अपार्टमेंट मधील नागरिकांची अवस्था सद्यस्थितीत दयनीय झाली असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.होय… विमल अपार्टमेंट आणि तापी सोसायटी या दोन्हीही बिल्डिंग इंदापूर मधीलच आहेत ज्या इंदापूरला स्वच्छता अभियानात केंद्रस्तरीय पुरस्कार मिळाला होता.स्वच्छ सुंदर शहर या उल्लेखनीय कामगिरीमुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते इंदापूर नगरपरिषदेचा विशेष गौरव होणार होता. इंदापूर नगरपरिषदेने शहर स्वच्छतेचा देशात आदर्श पॅटर्न निर्माण करून मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला होता.पण अगदी शाश्वत वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या कित्येक वर्षापासून शेकडो कुटुंब राहत असलेल्या राजवलीनगरच्या परिसरातील तापी सोसायटी व विमला अपार्टमेंट येथे ड्रेनेजची व्यवस्था व्यवस्थित नसल्याने शेकडो कुटुंबातील सदस्य यांना या घाणीच्या साम्राज्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील राहणाऱ्या कुटुंबांनी बऱ्याच वेळा या संदर्भात तक्रारी केल्या होत्या परंतु त्यांच्या समोरचा हा अस्वच्छतेचा प्रश्न आत्तापर्यंत ही तसाच आहे.केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत इंदापूर नगरपरिषदेने स्वच्छतेच्या संदर्भात विशेष उपक्रम राबवित सलग देशपातळीवरील चौथ्यांदा नावलौकिक मिळवला आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्रालयाच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण कचरामुक्त शहराचा निकाल जाहीर झाला होता यामध्ये इंदापूर नगरपरिषदेचा सन्मान झाला आहे ही वस्तुस्थिती असेल तरीही याची दुसरी बाजू पाहता पावसाच्या पाण्यामुळे तापी परिसरात तसेच विमल अपार्टमेंट झालेली दलदल झाली असून ड्रेनेजच्या पाण्याची सोय नसल्यामुळे तापी गृहनिर्माण सोसायटीच्या ज्या पाच विंग्स A, B, C, D, E. ह्या सर्वचं इमारतीमधील घाण ड्रेनेजच्या पाण्याचा फ्लो चेंबरमधून बाहेर येऊन सर्वत्र पसरलेला आहे त्यामुळे परिसरातदुर्गंधी पसरलेली आहे आणि तीच परिस्थिती विमल आपारमेंट मध्ये सुद्धा आहे.कित्येक नागरिक आजारी आहेत,लहान मुले आजारी आहेत.नागरिक चिखलावरून घसरण्याच्या घटना घडलेल्या आहेत.मुलांना शाळेला जाता येताना खूप त्रास होत आहेत. गाड्या- टू व्हिलर, फोर व्हिलर लावायची पंचायत झालेली आहे. ड्रेनेजचं पाणी A व B बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये घुसलेले आहे. त्यामुळे येथील नागरिक, रहिवाशी फार मोठ्या त्रासाला सामोरे जातं आहेत.आता तब्बल एक तप उलटून गेल्यानंतरही जर परिस्थिती “जैसे थे” राहत असेल तर या विमल अपार्टमेंट आणि तापी सोसायटी मधील लोकांनी फक्त मतदानच करायचे आणि निवडून द्यायचे एवढ्याच कामापुरते यांचा वापर होतोय का? असाच प्रश्न येथील लोकांना पडला आहे. त्यामुळे या महत्त्वपूर्ण प्रश्नाचा कायमस्वरूपी तोडगा कधी निघेल याचीच शेकडो कुटुंब वाट पाहत आहेत.