ऊसाच्या शेतात वर्षभरात घेतली 5 आंतरपिके; मिळाले 11 लाखांचे उत्पन्न, या शेतकऱ्यांचे कौतुक

अजय रंधवे: प्रतिनिधी
लखमापूर (जि.नाशिक) : स्पर्धेच्या युगात वावरताना शेतीत बदल करून तंत्रज्ञान वापरून केली तर नक्कीच चांगले उत्पन्न मिळू शकते. मोहाडी येथील शेतकऱ्याने असाच नाविन्यपूर्ण प्रयोग करीत वर्षभारात ऊसात पाच आंतरपिके घेतली.
यात दोन एकरात त्याला अकरा लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असलेला हा प्रयोग मोहाडी येथील विजय वानले यांनी केला आहे.

प्रेरणादायी असलेला मोहाडीचा प्रयोग :
विजय वानले शैक्षणिक क्षेत्रात असूनही शेतात नवीन काय करता येईल यासाठी सतत मेहनत घेत असतात. शेतीसाठी शाश्वत असलेलं एकमेव पीक म्हणजे ‘ऊस’ सध्या मानले जात आहे. वानले यांनी दोन एकराच्या क्षेत्रात कादवा कारखान्याच्या सुपरकेन नर्सरीतून पूर्व हंगामी सुरू ऊसाची लागवड केली. को दहा हजार एक व्हारायटीचे ऊस बेणे आणले. साडे तीन फुटाची जोड ओळ करून त्यात दीड फुटावर रोप लागवड करून दोन जोड ओळीत दहा फुटांचे अंतर ठेवले. त्यात उन्हाळ कांदा व कांदा पात पीक घेतले. जोडओळीमध्ये काबुली हरभऱ्याची लागवड केली. यामुळे इतर आंतर पिके घेतांना पूर्ण सूर्यप्रकाश मिळेल.
अशी घेतली इतर पीके:
मुख्यपीक ऊसाबरोबर वर्षभरात इतरही पिके घेण्यास त्यानी सुरवात केली. काबुली हरभरा हे पीक घेतले त्यातून त्यांना ४५ ते ५० हजार रुपये उत्पन्न मिळाले. कांदा व कांदा पात या पिकातून त्याना 3 लाख रुपये उत्पन्न मिळाले. कांदा काढल्यावर त्यानी त्याच क्षेत्रात कोथिंबीर घेतली, या पिकातून त्याना ६० हजार उत्पन्न मिळाले. त्यानंतर त्या क्षेत्रात त्यांनी भुईमूग पेरला. या पिकातून त्यांना साधारणत: एक लाख रुपये मिळतील. भुईमूग काढल्यानंतरही त्यात शेताला खत मिळण्यासाठी तागाची पेरणी केली जाणार आहे.

मशागतीस सोपे, खतही मिळाले:
मुख्य पीक ऊसाबरोबरच चार आंतर पिके व पाचवे शेताची पोत वाढण्यासाठी तागाची लागवड केली जाणार आहे. या आंतरपिकांमुळे आर्थिक उत्पन्न तर वाढलेच, शिवाय ऊसाचे खोडेचे वजन वाढण्यासही मदत होते. अंतरावर ऊस लागवड असल्याने त्यास पुरेसा सूर्यप्रकाठा मिळतो. हवा खेळती राहते. मशागत करण्यास सोपे जाते. ऊसाच्या पाचटपासून कंपोस्ट खत तयार होते. ऊसाची वाढ होत चालल्यानंतर त्याची बांधणी केली, पाचट तोडून त्याच्या सरीत टाकल्यामुळे खत तयार झाले. वर्षभरात दोन एकराच्या क्षेत्रात खर्च वजा जाता अकरा लाख रुपये मिळणार असल्याने शेती क्षेत्रात विजय वानले यांनी केलेला आंतरपिकाचा यशस्वी प्रयोग शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी व आदर्श आहे.



Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here