वीज पुरवठा चालूचा निर्णय; भाजप पुढे सरकार नमले
इंदापूर: महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम बंद करून, शेती पंपांचा वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत चालू करण्याचा निर्णय विधिमंडळात मंगळवारी घेतला.भाजपने राज्यभरात केलेल्या तीव्र आंदोलनामुळे व विधिमंडळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेपुढे अखेर महाविकास आघाडी सरकार नमले, अशी प्रतिक्रिया भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी (दि.15 )दिली.इंदापूर येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने शेती पंपाचा वीज पुरवठा सुरू करण्यात यावा, या मागणीसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक असे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाच्या वेळी दिलेले आश्वासन पाळले नाही तर येत्या एक-दोन दिवसात पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हर्षवर्धन पाटील यांनी दिला होता. सरकारच्या वीज तोडणी विरोधात भाजप कार्यकर्ते व शेतकरी आक्रमक झाले होते. मात्र विधानसभेत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज पुरवठा सुरू करण्याची घोषणा केली. ऊर्जा मंत्र्यांनी लवकर घोषणा केली असती तर शेती पिकांचे नुकसान टळले असते, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. आता महावितरणने बिले दुरुस्त करून द्यावीत व वीजबिल सवलती नुसार देय रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना आगामी काळात 4 हप्ते पाडून द्यावेत, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना त्रास देणे थांबावे, असा सल्लाही यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर व राज्यातील भाजप कार्यकर्त्यांचे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.