“इतक्या अमानुषपणे वार करणाऱ्या व्यक्ती हया माणूस असूच शकत नाही”- अजित पवार ,,, अल्पवयीन मुलीच्या हत्येवरून उपमुख्यमंत्री संतापले. वाचा नेमके काय झाले…

पुणे: पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन विद्यार्थीनी कबड्डी खेळत असताना तिच्यावर कोयत्याने वार करुन हत्या झाल्याची घटना अत्यंत निंदनीय व माणूसकीला काळीमा फासणारी आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण असून ही समाजविघातक मानसिकता संपवण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे.
शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येने सर्वांची मान शरमेनं खाली गेली असून मी तीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शासन करण्यात येईल. यापुढे कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ न देणं हीच आपल्या दिवंगत मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील अल्पवयीन कबड्डीपटूच्या हत्येबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
पुण्याचे पालकमंत्री तथा राज्य कबड्डी संघटना तसेच महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार, दिवंगत मुलीला श्रद्धांजली वाहताना म्हणाले की, अल्पवयीन मुलीवर इतक्या अमानुषपणे वार करणाऱ्या व्यक्ती माणूस असूच शकत नाही. त्यांचं कृत्य हे राक्षसी असून अशा वृत्ती वेळीच ठेचून काढल्या पाहिजेत.या हत्येमागच्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.
आरोपीस अटक, नक्की कसा प्रकार घडला ते वाचा: एकतर्फी प्रेमातून मुलीचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी हृषिकेश उर्फ शुभम भागवत (वय 21 वर्ष, रा.चिंचवड, मूळ रा.खंडाळा) याच्यासह त्याच्या साथीदारांना अटक केली आहे.
मंगळवारी घडलेल्या खुनाच्या या घटनेमुळे परिसरातील लहान मुले आणि नागरिक भीतीपोटी सैरावैरा पळायला लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. खून झालेली मुलगी कबड्डीपटू असून आठवीत शिक्षण घेत होती मंगळवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मैत्रिणींसोबत खासगी लॉन परिसरात कबड्डीचा सराव करीत होती. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघांपैकी नात्यातील आरोपी शुभमने तिला बाजूला बोलावून घेतले. त्यावेळी एकतर्फी प्रेमातून त्यांच्यात वादावादी झाली. त्याच रागातून शुभमने सोबत आणलेला कोयत्याने मुलीवर वार केले आणि क्रूर पद्धतीने तिचा गळा चिरून खून केला. त्यानंतर तिन्ही आरोपींनी घटनास्थळी कोयता आणि खेळण्यातील पिस्तूल टाकून पळ काढला.


Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here