इंदापूर पोलिसांची दबंग कामगिरी : बावडा येथील दरोडा प्रकरणातील आरोपींना कर्जतला (जि.अहमदनगर) जाऊन ठोकल्या बेड्या.

गेल्या काही दिवसापासून इंदापूर पोलिस स्टेशनची कामगिरी दमदार स्वरूपाची झालेली दिसून येत आहे.अनेक चोरीप्रकरणी उघडकीस करून मुद्देमाल हस्तगत करणे, बेकायदेशीर गोमांस,दरोडा अशा गोष्टी नियंत्रित आणून एक प्रकारे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात इंदापूर पोलिस स्टेशन यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.अनेक गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तडीपार करून सामान्य लोकांना एक प्रकारे दिलासा देण्याचा प्रयत्न इंदापूर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सिंघम अधिकारी मुजावर साहेब यांच्या माध्यमातून होत आहे.
बावडा येथील काकडेवस्ती दरोड्यातील काही आरोपींना इंदापूर पोलिसांनी काही दिवसातच शोध लावून ताब्यात घेतले आहे. इंदापूरचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या कारवाईमध्ये असे चोर, भामटे सुटूच शकत नाहीत. त्यामुळे चोरांनो नाद करा पण इंदापूर पोलिसांचा कुठं ? अशीच सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.
सविस्तर माहिती अशी की, दि.१५ सप्टेंबर रोजी फिर्यादी अनिता अंकुश काकडे (वय ३५ वर्षे रा. बावडा काकडेवस्ती ता. इंदापुर जि.पुणे) यांनी फिर्याद दिली की दि.१५ सप्टेंबर रोजी रात्री २.०५ वा. चे सुमारास मौजे बावडा गावचे हददीत काकडेवस्ती ता. इंदापुर जि.पुणे येथील फिर्यादीच्या राहत्या घराचा दरवाजा तोडुन सहा इसमांनी फिर्यादीच्या घराचा दरवाजा जोरात ढकलल्याने आतील बाजुचा कडी कोयंडा उचकटुन घरामध्ये प्रवेश करून चाकुचा धाक दाखवुन फिर्यादीच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून घेतले तसेच फिर्यादीचे पतीस व मुलगा यास जिवे ठार मारण्याची धमकी देवून लोखंडी पाईप हाताबुक्यांनी मारहाण करून एकुण १,११,७००/- रूपयांचे सोन्या चांदीचे दागीने घरफोडी करून जबरदस्तीने चोरून नेल्याने इंदापुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची घटना घडलेनंतर फिर्यादीचा मुलगा याने पोलींसाना फोन करून सांगीतल्यांनतर इंदापुर पोलीसांनी बेडशिंग रोड, बाभुळगाव पाटी, गलांडवाडी नं २ सदर ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली. गोपनिय बातमीदाराकडुन दोन मोटारसायकलवरती प्रत्येकी तीन-तीन असे इसम बसुन भांडगाववरून अवसरी गावच्या दिशेने जात असल्याची माहिती समजली सदर मोटारसायकलचा पाठलाग केला असता तीन इसम एक बिगर नंबर प्लेटची गाडी ऊसाच्या शेतामध्ये टाकुन अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले. सदर गाडी गुन्हयाचे तपासात जप्त करून गाडीबाबत माहिती घेवुन गाडीमालक यांचे घरी जावुन तपास केला असता सदरची गाडी इस्लामपुर जि. सांगली येथुन चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. सदर गाडीबाबत इस्लामपुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद असल्याची माहिती मिळाली. चोरीची गाडी वापरत असलेल्या इसमाबाबत तपास केला असता फिर्यादीने सांगीतलेले वर्णन, गोपनिय बातमीदार यांनी दिलेली माहिती व शास्त्रोक्त पदधतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर गुन्हयातील आरोपी अहमदनगर जिल्हयातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग गणेश इंगळे व पोलीस निरीक्षक टी. वाय मुजावर यांनी तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना योग्य त्या सुचना देवून मार्गदर्शन केले. त्यानुसार दि.२६ सप्टेंबर रोजी तपासकामी रवाना होवुन अहमदनगर जिल्हयातील कर्जत येथे जावुन गोपनिय बातमीदाराकडुन महिती घेतली असता सदरचे आरोपी हे राजीवगांधीनगर झोपडपटटी कर्जत येथे राहत असल्याची बातमी मिळाली इंदापुर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अधिकारी अंमलदार व स्थानिक पोलीसांचे मदतीने सापळा रचुन राजीवगांधीनगर झोपटपटटी कर्जत येथून १) संजय उर्फ निंगऱ्या देविदास भोसले वय २५ वर्षे २) अक्षय उर्फ आलेश देविदास भोसले वय २१ वर्षे रा. राजीवगांधीनगर झोपडपटटी कर्जत ता. कर्जत जि. अहमदनगर या दोन आरोपीना ताब्यात घेतले.
त्याचेकडे गुन्हयाचे अनुशंगाने तपास केला असता सदर गुन्हा केला असल्याची कबुली दिली. तसेच त्यांनी गुन्हा करण्याआधी इंदापुर पोलीस स्टेशन हददीत येवुन ऊसतोडणी कामगार असल्याचे सांगुन रेकी केली व विरळ लोकवस्ती असलेले घर निवडुन त्याठिकाणी अटक आरोपीसह इतर पाच जणांनी मिळुन काकडेवस्ती बावडा येथे दरोडा टाकला आहे. सदर आरोपींताकडुन गुन्हयामध्ये केलेल्या व गुन्हयात वापरलेली हत्यार खालीलप्रमाणे हस्तगत करण्यात आले आहेत. त्याचे वर्णन खालीलप्रमाणे. १) २३,००० /- रू किंमतीचे अर्धा तोळे वजनाचे सोन्याचे मनीमंगळसुत्र, चाकु व लोखंडी पाईप जप्त करण्यात आले आहे.
सदर गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे व पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मागदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील हे करीत आहेत.
सदर आरोपी हे पोलीस कस्टडीमध्ये असुन त्यांच्याकडून इतर गेलेला माल व फरारी आरोपी याबाबत तपास चालू आहे. तसेच आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
वरील कामगिरी पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांचे मागदर्शनाखाली इंदापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, स.पो.नि नागनाथ पाटील, पो.उपनिरीक्षक पाडूळे, सहा फौजदार शिंदे, पो. हवा. गायकवाड, म.पो. हवा खंडागळे, पो ना खान पो कॉ चौधर, पो कॉ जमादार, पो. कॉ राखुंडे, पोलीस मित्र अनिल शेवाळे यांनी मिळुन केली आहे.
चौकट:- गेल्या चार महिन्यांमध्ये तब्बल 1 कोटी 60 लाखाचा गुटखा सर्व मुद्देमाल इंदापूर पोलीस स्टेशने हस्तगत केला आहे त्याचप्रमाणे काही दिवसापासून इंदापूर पोलिस स्टेशन हे पेट्रोलिंग च्या कामगिरीतून इंदापूरकरांचे मन जिंकण्यात यशस्वी झालेले असून प्रत्येक गल्लोगल्ली व सर्व अंतर्गत नागरिक वस्ती तसेच दिवाळीच्या सीझनमध्ये व इतर सणावरात सर्व व्यापारी वर्गांच्या दारोदारी चालत जाऊन इंदापूर पोलिसांनी पेट्रोलिंग ची जबाबदारी पार पाडली होती त्यामुळे इंदापूर मधील सर्वसामान्य जनता इंदापूर पोलिस स्टेशनच्या कामावर समाधानी असल्याचे चित्र दिसून येत आहे.. त्याचबरोबर इंदापूर पोलिस स्टेशन च्या ऑफिस परिसरातील साफसफाई ,स्वच्छता व रंगरंगोटी चांगल्या पद्धतीने झाली असल्याने इंदापूर पोलिस स्टेशन हे एक सुसज्ज कार्यालय दिसत आहे एकूणच इंदापूर पोलीस हे इंदापूरकरांचे मन जिंकण्यात यशस्वी झालेले आहेत .

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here