इंदापूर:दरोड्याच्या हेतूने येऊन धारदार शस्त्राने वार करत रोख रक्कम व मौल्यवान दागिने घेण्याचा प्रकार नुकताच इंदापूर तालुक्यात घडला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की इंदापूरच्या तालुक्यातील जंक्शन वालचंदनगर परिसरातील कर्मयोगी कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गायकवाड यांच्या घरांवर दरोडेखोरांनी दरोडा घालून रोख दीड लाख रुपये, साडे चौदा तोळे सोने व चांदीचा ऐवज लंपास केला आहे.या दरोड्यात चोरांनी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गायकवाड यांना जबर मारहाण केली आहे. त्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. २७) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास सहा दरोडेखोरांनी रत्नपुरी जवळील गायकवाड वस्ती येथील कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गायकवाड यांच्या बंगल्याचा दरवाजा कटावणीच्या सहाय्याने तोडून घरामध्ये प्रवेश केला. यावेळी गायकवाड यांच्या पत्नी सुनंदा जाग्या झाल्या. दरम्यान चोरांनी सुनंदा यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून कपाटातील सर्व ऐवज देण्यास सांगितले. सुनंदा यांनी घाबरून जाऊन कपाटातील रोख रक्कम दीड लाख, ११ तोळे सोन्याचे दागिने व चांदी असा ऐवज काढून दिला.
त्याचवेळी राजेंद्र गायकवाड जागे झाले आणि त्यांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरांनी राजेंद्र गायकवाड यांना काठीने मारहाण करत त्यांच्या कपाळावर धारदार शस्त्राने वार केला. यामध्ये राजेंद्र गायकवाड गंभीर जखमी झाले. घटनास्थळी बारामती विभागीय अधिकारी इंगळे ,भिगवन पोलीस ठाण्याचे दिलीप पवार यांनी भेट दिली. सदर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे करीत आहेत. इंदापूर तालुक्यात नाईट पेट्रोलिंग चे प्रमाण वाढलेले असून यामध्ये पुणे जिल्ह्यात पेट्रोलिंग साठी इंदापूर तालुका हा आदर्श तालुका असल्याचे उदाहरण दिले जाते परंतु याच तालुक्यात अशा प्रकारचा दरोडा पडल्याने पोलिसांची जबाबदारी मात्र वाढलेली दिसून येते.