इंदापूर तालुक्यात प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर मालकावर तलवारीने हल्ला, निरा भिमा कारखाना परिसरातील घटनेने पंचक्रोशीत दहशतीचे वातावरण.. वाचा सविस्तर..

इंदापूर: ज्या दिनी देशात कायद्याचं राज्य आलं त्याच प्रजासत्ताक दिनी कायदा पायदळी तुडविण्याचं काम काही तरुणांकडून इंदापूर तालुक्यात घडलं. “आमच्या गावातून ट्रॅक्टर घेऊन जायचा नाही अन्यथा वाईट परिणाम होतील” अशी धमकी देत एका निरपराध ट्रॅक्टर मालकाला ९ जणांच्या टोळक्याने तलवारी, सत्तुर अशा धारदार शस्त्रांनी जीवे मारण्याचा प्रयत्न 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सायंकाळी सव्वा सहाच्या दरम्यान केला.
निरा भीमा कारखाना चौकात घडलेल्या धक्कादायक घटनेसंदर्भात जीवन ज्ञानदेव जाधव (रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली असून, गौरव दत्तात्रय देवकर, रोहित उर्फ नन्या दत्तात्रय देवकर, अक्षय सुरेश देवकर (सर्व रा. रेडा, ता इंदापूर) यांच्यासह अनोळखी सहा जणांच्या टोळक्याविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात भा.द. वि. कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी ट्रॅक्टर चालक असून,मशागती करण्यासाठी आमच्या गावात यायचं नाही अशी धमकी वारंवार फिर्यादीला वरील आरोपींकडून दिली जात होती.दरम्यान या आरोपींनी फिर्यादीला गुरुवारी संबंधित ठिकाणी येण्याची,न आल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. घाबरून नीरा भीमा चौकात आलेल्या फिर्यादीला दुचाकीवरून तलवार, सत्तूर आणि इतर धारदार हत्यारांसह आलेल्या या तरुणांनी फिर्यादीला दमदाटी शिवीगाळ करत धारदार हत्यारांनी मारहाण केली.
👉 आठवडा बाजारामध्ये दहशतीचे वातावरण: दर गुरुवारी निरा भिमा कारखाना लगत आठवडा बाजार भरत असतो. यामध्ये रेडा,रेडणी,लाखेवाडी, काटी,शेटफळ हवेली,भोडणी या गावातील शेतकरी व मजूर लोक मोठ्या प्रमाणात येत असतात.नेमका हाच बाजार चालू असताना साधारण संध्याकाळी सहाच्या दरम्यान हा तलवारीने हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याचबरोबर 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र दिवशी अशी घटना योग्य नाही अशीही चर्चा यावेळी होत होती.


👉 डीवायएसपी गणेश इंगळेसाहेब व पोलीस निरीक्षक दिलीप पवारसाहेब यांची तत्परता: हा खुनी हल्ला झाल्याचे समजताच अवघ्या तासाभरातच कर्तव्यदक्ष डीवायएसपी गणेश इंगळे व इंदापूर पोलीस स्टेशनचा नवीनच पोलीस निरीक्षक पदभार संभाळणारे दिलीप पवार यांनी फिर्यादी जीवन जाधव यांची उपजिल्हा रुग्णालयात जाऊन स्वतः माहिती घेतली व त्याचबरोबर कोणत्याही प्रकारे आरोपींना पाठीशी घातले जाणार नाही याचीही खात्री दिली व आरोपी पकडण्यासाठी त्वरित सूत्रे हलवली.


👉 दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या खुनी हल्ल्यातील आरोपींपैकी मध्यरात्री एक रोहित देवकर या आरोपीला तर आज शुक्रवारी दुपारी अक्षय देवकर या आरोपीला पोलीस उपनिरीक्षक नागनाथ पाटील यांनी  ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली.


👉 गुंड प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवा: शेटफळ हवेली तंटामुक्ती अध्यक्ष संजय शिंदे – दरम्यान निराभिमा कारखाना लगत असणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवा व त्यांच्यावर कठोर शासन करा असे शेटफळ हवेली तंटामुक्ती अध्यक्ष संजय शिंदे यांनी माध्यमाशी बोलताना पोलिसांना मागणी केली. एक आरोपी ताब्यात मिळाला असून इतर आरोपींना त्वरित अटक करावी व जर याला दिरंगाई झाली तर सर्व शेटफळ हवेलीतील नागरिक मिळून संविधानिकरित्या आंदोलन करू असेही संजय शिंदे यावेळी म्हणाले.


Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here