भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ शेटफळ हवेली आयोजित शिर्डी – नाशिक – त्र्यंबकेश्वर – वणी सहल.
इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली या गावी सर्व जाती धर्मातील ज्येष्ठ नागरिक एकत्र येत एक आदर्शवत ज्येष्ठ नागरिक संघ उभारला आहे. ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून गावातील वयोवृद्ध शेतकरी, निवृत्त अधिकारी, मजूर, सर्व जाती-धर्माच्या लोक या छत्राखाली एकत्र येतात त्याचप्रमाणे व्यसनमुक्त होण्याची संकल्पना ही करतात. आजपर्यंत काही लोकांनी या संघात आल्यापासून व्यसन सोडून दिले आहे या गोष्टीचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. गावामध्ये ठीक ठिकाणी वृक्षारोपण या माध्यमातून झाले आहे तर नुसते वृक्षारोपण नव्हे तर वृक्ष संवर्धन ही काळाची गरज ओळखून ट्रीगार्ड बसवत त्या झाडाला जपले जाते. येणाऱ्या काळात सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्याचाही मानस आता या संघाने घेतला आहे.ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री निवृत्ती शिंदे कार्याध्यक्ष श्री हनुमंत शिंदे सचिव दशरथ शिंदे यांचे संकल्पनेतून सालाबाद प्रमाणे सहलीचे आयोजन करण्यात आले होते.सहलीसाठी एकूण 36 जेष्ठ नागरिक सहभागी झाले होते.दिनांक 18 मार्च 2024 रोजी सकाळी सहा वाजता ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवताची श्री बाळासाहेब नलवडे यांनी विधिवत पूजा करून श्रीफळ अर्पण केले तसेच श्री शंकर नलवडे यांनी सहलीच्या बसची पूजा करून श्रीफळ अर्पण केले. त्यानंतर श्रीमती शुभांगी मोरे व संताजी नलवडे यांनी सर्व ज्येष्ठांना गुलाब पुष्प देऊन पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणातून प्रस्थान केले. पहिल्या दिवशी प्रवासादरम्यान सर्व ज्येष्ठ नागरिकांना निवृत्ती आबा शिंदे यांनी नाश्ता व चाहापण्याची सोय केलेली होती.दिवसभरात शनिशिंगणापूर, नेवासा ज्ञानेश्वर माऊली स्तंभाचे दर्शन, प्रवरा-गोदावरी नदींच्या संगमावरती श्रीक्षेत्र देवगड येथे श्री दत्तगुरूंचे दर्शन घेऊन शिर्डी येथे सर्व ज्येष्ठ नागरिक मुक्कामी थांबले.श्री साईनाथांचे दर्शन घेऊन दिनांक 19 मार्च 2024 रोजी सकाळी सहा वाजता वणी येथील सप्तशृंगी गडाकडे प्रयाण केले व सप्तशृंगी मातेचे दर्शन घेऊन नाशिककडे प्रयाण- श्री काळारामाचे दर्शन घेऊन श्रीक्षेत्र त्रिंबकेश्वराचे दर्शन घेतले व परतीचा प्रवास सुरू झाला.परतीच्या प्रवासामध्ये रात्री नऊ वाजता सुंदर अशा हॉटेलमध्ये मुरलीधर चव्हाण यांनी सर्व ज्येष्ठांना रुचकर अश्या भोजनाची सोय केली.दोन दिवसांच्या प्रवासामध्ये श्री हनुमंत शिंदे,आजिनाथ शिंदे, कालिदास भोसले यांनी सामूहिक श्रीरामाचे भजन व हरीपाठाचे पठण करून सर्व ज्येष्ठांना आनंदी व उत्साही अश्या भक्तिमय वातावरणात प्रवास करण्यास मदत केली. सहलीसाठी टूर्स ट्रॅव्हल चे संचालक अजीज आतार पिंपरी बुद्रुक यांनी विनम्र सेवा दिली त्याबद्दल जेष्ठ नागरिक संघाकडून यांचे आभार मानण्यात आले.20 मार्च 2024 रोजी सकाळी साडेपाच वाजता संघाचे सचिव श्री दशरथ शिंदे यांनी सुप्रभात अशा शुभेच्छा देऊन सहलीचा गोड आनंदी वातावरणात समारोप केला.प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी कसलीही महत्त्वाची कामे असली तरी गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक गावात स्थापन केलेल्या मध्यवर्ती कार्यालयात एकत्र येतात. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचा त्या महिन्यात असलेला वाढदिवस सर्वजण मिळून साजरा करतात, ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणी आरोग्य समस्या ह्या जाणून घेतल्या जातात. त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिक एकत्र येतात व विचाराची देवाण-घेवाण होऊन जुन्या आठवणींना उजाळाही मिळतो. या संघात आलेल्या ज्येष्ठांना आनंदी जीवन जगण्याचा मूलमंत्र दिला जातो त्यामुळे तालुक्यात सर्वात आदर्शवत ज्येष्ठ नागरिक संघ म्हणून शेटफळ हवेलीच्या संघाकडे पाहिले जाते.