इंदापूर: काही वेळापूर्वी म्हणजेच मंगळवार दिनांक 2 मे रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान पळसदेव नाजिक काळेवाडी हद्दीत पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत नर बिबट्या मृत्युमुखी पडण्याची घटना घडली आहे.
हा नर बिबट्या साधारण पाच वर्षाचा असण्याची शक्यता असून अज्ञात वाहनाची जबर धडक बसल्याने हायवेवरच तो मृत्युमुखी पडला होता.यानंतर इंदापूर टोल नाक्याच्या पेट्रोलिंग टीमच्या साह्याने या बिबट्याला रस्त्याच्या बाजूस ठेवण्यात आले असून या कर्मचाऱ्यांनी वनखात्यास सदरची माहिती दिलेली आहे.यापूर्वी बऱ्याच वेळा पळसदेव ते लोणी देवकर च्या दरम्यान बिबट्या दिसल्याची चर्चा शेतकरी व प्रवासी यांच्याकडून ऐकायला मिळत होती परंतु ही चर्चा खरी होती असेच आता म्हणावे लागेल. इंदापूर तालुक्यातील भिगवन, शेटफळगढे या भागात सुद्धा यापूर्वी बिबट्या दिसल्याची चर्चा ऐकायला मिळाली होती.या भागात वनक्षेत्र जास्त असल्याने बिबट्याला पोषक असे वातावरणही या ठिकाणी आहे त्यामुळे आणखी बिबटे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.