इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायत उमेदवार व सरपंच यांचे भविष्य पेटीत बंद,मातब्बर नेत्यांचे भविष्य धोक्यात. गावगाड्याच्या किल्ल्या कोणाकडे उद्या समजणार.

इंदापूर: इंदापूर तालुक्यात नुकतीच ग्रामपंचायतीची रणधुमाळी संपली असून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा यांच्यात खरी लढत असून कार्यकर्ते आमने-सामने आल्याने ऐन थंडीत सुद्धा वातावरण तापलेले पाहायला मिळाले.जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, माजी सदस्य श्रीमंत ढोले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी अध्यक्ष महारुद्र पाटील, युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर, भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार, बाळासाहेब व्यवहारे, पांडुरंग मारकड या सर्व मातब्बर नेत्यांचे राजकीय भवितव्य याच निवडणुकीवर अवलंबून आहे.गावागावांत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं वारं घराघरांत शिरलं होते. साम-दाम-दंड-भेद सारे प्रकार वापरून पंचायतीवर आपलाच झेंडा कसा फडकेल यासाठी गावातले गट-तट जीवाचं रान करीत होते.
बाहेरगावी असलेले मतदार गावात आणण्यासाठी गाड्या पाठवण्यात आल्या होत्या व येताना जेवणाची सुद्धा सोय झाली होती. पोस्टाच्या मतावरही सर्वांचे लक्ष आहेच. निवडणूक शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी प्रशासनने व खास करून कर्तव्यदक्ष तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी योग्य ती सर्व प्रकारची खबरदारी घेतली होती घेतली होती. इंदापूर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पोलीसफाटा तैनात करण्या आला होता.प्रामुख्याने संवेदनशिल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावांमध्ये अधिक प्रमाणावर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आली होती.तर दुसर्‍या बाजूला विजयी गुलालाची खात्री असलेल्या व गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच गाड्यांच्या पुंगळ्या काढून मिरवणुकीची तयारी केली आहे.पडस्थळ, मदनवाडी, माळवाडी, रणमोडवाडी, डाळज नं. २, बीजवडी, लाखेवाडी, थोरातवाडी, जांब, बोरी, न्हावी, हिंगणगाव, झगडेवाडी, कळाशी, कुरवली, म्हसोबावाडी, मानकरवाडी, रेडणी, डाळज नं.१, डाळज नं. ३, बेलवाडी, डिकसळ, अजोती, सराटी, पिंपरी खुर्द, गंगावळण, या इंदापूर तालुक्यात २६ ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंच व सदस्य यांचे आता भविष्य मतपेटीमध्ये बंद झाले आहे. अनेक मातब्बर नेत्यांचा टांगा पलटी होणार असून अनेकांचे भवितव्य धोक्यात येणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागले आहेत. ग्रामपंचायतीच्या याच पुढार्‍यांच्या निकालावर इंदापूर तालुक्याचे आमदार व माजी आमदार यांचेही भविष्य ठरणार आहे. त्यामुळे याच नेत्यांचे कार्यकर्ते गुलाल उधळणार की त्यांच्या पदरी निराशा येणार हे उद्या समजेल.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here