इंदापूर: सरडेवाडी (ता. इंदापूर) टोल नाक्यावर सोमवारी (६ फेब्रुवारी) रात्री सोलापूर जिल्ह्यातील युवकांनी हैदोस घातला. कर्मचाऱ्यांनी टोल मागितल्याने सदर युवकांनी हा गदारोळ घातला असून, शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही या युवकांनी टोल कर्मचाऱ्यांना दिली. हा सर्व प्रकार सोमवारी रात्री ११ वाजून ३० मिनिटांच्या आसपास घडला. या संदर्भात टोल प्रशासनाचे मॅनेजर हरिश्चंद्र जाधव यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
लेन नंबर ११ वर सोलापूरहून आलेल्या ब्रिझामधून विजय थोरे, संतोष गरड, विठ्ठल गवळी (सर्व रा. वरवडे, ता. माढा) या तिघा युवकांनी टोल न घेता गाडी सोडण्यासाठी कर्मचाऱ्यांना दमबाजी केली. मात्र नियमबाह्य पद्धतीने सोडण्यास कर्मचाऱ्यांनी नकार दिला. परिणामी या तिघा सोलापूरकरांनी टोल बाप की जागीर असल्याप्रमाणे गदारोळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी टोल कर्मचाऱ्यांसह मॅनेजरनेही तिघा उपद्रविंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु सैतान डोक्यात घुसलेल्या या युवकांनी काही एक न ऐकता शिवीगाळ आणि धमकी द्यायला सुरुवात केली. या शिवाय या प्रवासी युवकांनी चार लेनचे बुम बाजूला करून तब्बल २५ वाहने विना टोल सोडून दिले.टोल वरील सीसीटिव्ही फुटेज व इतर पुराव्यानुसार आता इंदापूर पोलीस संबंधित तिघा जणांचा शोध घेत आहेत.
Home Uncategorized इंदापूर टोल नाक्यावर सोलापूर जिल्ह्यातील युवकांचा गदारोळ..कर्मचाऱ्यास जीवे मारण्याची ही धमकी.